मातृछत्र हरपलेल्या तिळ्या मुलींना मिळाली मायेची ऊब

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 16 मे 2019

नातेवाईकांच्या पुढाकाराने पीडित परिवार मुली दत्तक देण्यास तयार झाला. नाशिक, धुळे येथील शिक्षक दांपत्य, तर सुरत येथे खाजगी व्यावसायिक दांपत्य यांनी तिघींना मायेचा आधार दिला. मोठी मुलगी योगेश्वरी वरझडी(ता.शिंदखेडा) येथे आजोबांकडे राहते. अवनी(नाशिक), जिया(धुळे) व खुशी(सुरत) अशी तिघींची नावे ठेवण्यात आली असून सद्या तिन्ही मुलींची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या पालकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

निजामपूर-जैताणे (धुळे) : तिळ्या मुलींना जन्म देणाऱ्या जैताणे(ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी मनीषाबाई छोटू खलाणे (वय-26) या तरुण महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या सहाच दिवसांनी, चार एप्रिलला मृत्यू झाल्याने येथील खलाणे परिवार व वरझडी (ता.शिंदखेडा) येथील रामकोर परिवारावर दुःखाचा आघात झाला. सहा दिवसांच्या या तीन चिमुरडींचा सांभाळ कसा करावा? या विवंचनेत खलाणे परिवार असतानाच नाशिक, धुळे व सुरत येथील तीन दांपत्यांनी पुढाकार घेत या तिन्ही चिमुकलींना मायेचा हात देऊन माणुसकीची प्रचिती दिली. 

30मार्चला धुळे जिल्हा रुग्णालयात मयत मनीषाबाई खलाणे यांनी तिळ्या मुलींना जन्म दिला होता. दोंडाईचा, धुळे येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. परंतु अतिरक्तस्रावामुळे प्रकृती खालावल्याने चार एप्रिलला सायंकाळी सातच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे औरंगाबादला दुर्दैवी निधन झाले. आई काय असते? याची पुसटशीही कल्पना नसलेल्या अवघ्या सहा दिवसांच्या या चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले.

मयत मनीषाबाई खलाणेची मोठी मुलगी योगेश्वरी(वय-2) हिच्यासह चारही मुली आईविना पोरक्या झाल्या. विधवा सासू फुलाबाई खलाणे वयोवृद्ध असल्याने व पती छोटू खलाणे अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांच्या गरीब कुटुंबियांपुढे चारही मुलींच्या पालनपोषणाचा व संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला. पुढे काय करावे? या विवंचनेत असतानाच नाशिक, धुळे व सुरत येथील अनुक्रमे पाटकर, भदाणे व खलाणे या विनापत्य दाम्पत्याने पीडित परिवाराशी संपर्क साधत या मुलींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली.

नातेवाईकांच्या पुढाकाराने पीडित परिवार मुली दत्तक देण्यास तयार झाला. नाशिक, धुळे येथील शिक्षक दांपत्य, तर सुरत येथे खाजगी व्यावसायिक दांपत्य यांनी तिघींना मायेचा आधार दिला. मोठी मुलगी योगेश्वरी वरझडी(ता.शिंदखेडा) येथे आजोबांकडे राहते. अवनी(नाशिक), जिया(धुळे) व खुशी(सुरत) अशी तिघींची नावे ठेवण्यात आली असून सद्या तिन्ही मुलींची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या पालकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

वरझडी(ता.शिंदखेडा) येथील सुशिलाबाई पांडुरंग रामकोर व पांडुरंग रतन रामकोर (माळी) या गरीब शेतकरी परिवाराने आपल्या एकुलत्या मयत मुलीची मोठी मुलगी योगेश्वरी हिच्या पालनपोषण, शिक्षण व संगोपनासाठी भरीव शासकीय आर्थिक मदत मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आधारसिंग गिरासे यांनी यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. आगामी काळात तिन्ही परिवारांनी आपापसात समन्वय ठेवून या चिमुकलींच्या भेटी घडवून आणण्याची गरज व्यक्त करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family adopt three girls in Jaitane