
जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक पीक साक्री तालुक्यात घेतले जाते. नंतर धुळे, शिंदखेडा तालुक्यांत सर्वसाधारण प्रमाणात कांदा घेतला जातो.
धुळे ः केंद्र सरकारने १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठविली आहे. या निर्णयाचा साक्री तालुक्याच्या पदरात अधिक लाभ पडेल. पाठोपाठ धुळे, शिंदखेडा तालुक्याला सर्वसाधारण लाभ होऊ शकेल. निर्यात खुली झाल्याने कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपयांहून अधिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा येथील उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
केंद्राने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी रान उठविले होते. खुद्द भाजपचे अनेक खासदार मोदी सरकारवर नाराज होते. शेतकऱ्यांची या निर्णयामुळे कोंडी तर झालीच शिवाय त्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा असतानाच निर्यातबंदीमुळे उत्पादनासह आर्थिक नुकसान सोसावे लागले. रांगडा कांदा तर खराबही झाला.
कांद्याची अशी निर्यात
जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक पीक साक्री तालुक्यात घेतले जाते. नंतर धुळे, शिंदखेडा तालुक्यांत सर्वसाधारण प्रमाणात कांदा घेतला जातो. शिरपूर तालुक्यात फारसा कांदा घेतला जात नाही. येथील कांद्याची प्रत चांगली असल्याने अमृतसर, दिल्ली, राजस्थान, मलेशियापर्यंत कांद्याची निर्यात झाली आहे. विदेशात कांदा निर्यात होण्यासाठी येथील शेतकरी राज्यात प्रसिद्ध लासलगाव (जि. नाशिक) येथील व्यापाऱ्यांना कांदा पुरवितात.
...तर शेतकऱ्यांचा लाभ
खरिपातील कांद्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. यात निर्यातबंदीमुळे अधिकच आर्थिक फटका सोसावा लागला. कोरोना संकटकाळामुळे कांदा व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. आता निर्यातबंदी उठल्याने चलनवलन वाढीस लागेल, शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकेल. कांद्याची निर्यात वाढली तर भाववाढ होईल. ती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. निर्यातबंदीबाबत सरकारचे धोरण चुकीचेच आहे. आयात- निर्यातीबाबत धोरण कायम निश्चित असले पाहिजे, असे पढावद येथील कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील, धुळे येथील कांदा व्यापारी विनोद सोमनाथ चौधरी यांनी सांगितले.
भाववाढीची मागणी
निर्यात खुली झाल्याने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपयांहून अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त झाली. सद्यःस्थितीत बाजार समितीत कांद्याचा प्रतिक्विंटल भाव २,२०० ते २,३०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची नवीन लागवड केल्याने त्यांना निर्यात खुली होण्याचा लाभ होऊ शकेल. चवीमुळे आपल्या कांद्याला विदेशात चांगली मागणी असल्याचे ॲड. पाटील, श्री. चौधरी यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात कांदालागवड
- खरीप : ५५७ हेक्टरवर
- रब्बी : १५,९५५ हेक्टरवर