गॅस सिलेंडरच्या गळतीने शेतकऱ्याच्या घराला आग!

भगवान जगदाळे
रविवार, 23 डिसेंबर 2018

शेतकरी गोकुळ भलकारे हे आपली पत्नी लक्ष्मीबाई भलकारे व नातू विजय यांच्यासह धनगर वाड्यात राहतात. त्यांची तिन्ही विवाहित मुले दादाभाई, दिलीप, नानाभाऊ गावातच विभक्त राहतात. गोकुळ भलकारे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. घरात स्वयंपाकासाठी ते इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडरचा वापर करतात.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगरवाड्यातील रहिवासी तथा शेतकरी गोकुळ संपत भलकारे (वय-78) यांच्या राहत्या घरास शुक्रवारी (ता.21) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

शेतकरी गोकुळ भलकारे हे आपली पत्नी लक्ष्मीबाई भलकारे व नातू विजय यांच्यासह धनगर वाड्यात राहतात. त्यांची तिन्ही विवाहित मुले दादाभाई, दिलीप, नानाभाऊ गावातच विभक्त राहतात. गोकुळ भलकारे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. घरात स्वयंपाकासाठी ते इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडरचा वापर करतात. शुक्रवारी (ता.21) गॅस सिलेंडर संपल्याने त्यांनी योगलक्ष्मी इंडेन ग्रामीण वितरक, वासखेडी रोड, जैताणे येथून नवीन गॅस सिलेंडर मागविले. त्यांचा लहान मुलगा नानाभाऊ याने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ते सिलेंडर गॅस शेगडीला जोडले. 

त्यानंतर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्वयंपाकासाठी गॅस पेटविला असता रेग्युलेटरजवळ अचानक आग लागली. लक्ष्मीबाई यांनी आरडाओरड केली तेव्हा आग लागल्याचे इतरांच्या लक्षात आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आग जास्तच भडकली. अखेरीस घाबरून सर्वजण घराबाहेर पळाले. पाहता पाहता पूर्ण घरालाच आग लागल्याने वयोवृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत संसारोपयोगी साहित्यासह सुमारे दहा लाखाच्या वस्तू जळून खाक झाल्या. त्यात सुमारे 5 क्विंटल कापूस, 3 क्विंटल बाजरी, 1 क्विंटल गहू, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, जळालेले घर आदींचा समावेश आहे. सदर आग साक्री येथील अग्निशामक दलाने रात्री नऊच्या सुमारास विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही व मोठा अनर्थ टळला.

शनिवारी (ता.22) सकाळी जैताणेच्या तलाठयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दुपारी गोकुळ भलकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमीन पिंजारी घटनेचा पुढील तपास करीत आहेत. डोक्यावरचे छत जळून खाक झाल्याने गोकुळ भलकारे सध्या पत्नी व नातवासह आपल्या मुलांकडे राहत आहेत. आपल्याला तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा गोकुळ भलकारे यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer home torched on fire in Jaitane