अन्यथा वीजतारांना स्पर्शू करून आत्महत्या करू! 

जगन्नाथ पाटील
Wednesday, 17 February 2021

वीजतारांचा काही अपघात घडल्यास गहू बेचिराख होण्याची भीती आहे. त्यामुळे तारांची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी केली.

कापडणे  : येथील शेतकरी वसंत पाटील व मच्छिंद्र पाटील यांनी धनूर शिवारात गट क्रमांक ४६ मध्ये राजेश कृष्णा पाटील या मालकाच्या शेतजमिनीत दहा एकर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली आहे. मात्र ट्रान्स्फॉर्मर क्रमांक नऊच्या वीजतारा गव्हाच्या शेतावर जमिनीपासून केवळ तीन ते चार फुटांवर लोंबकळत आहेत. यामुळे पिकासह जिवाला धोका निर्माण होऊन त्या तारा वर करण्याची मागणी वारंवार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त पाटील पिता-पुत्राने वीजतारांनाच स्पर्शून आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

आवश्य वाचा- धुळ्यात सभापती, उपसभापती फायनल !
 

मोठ्या अडथळ्यांनंतर गव्हाची पेरणी केली असून, आता कोरडा झालेला गहू काढणीस आला आहे. मात्र अशात वीजतारांचा काही अपघात घडल्यास गहू बेचिराख होण्याची भीती आहे. त्यामुळे तारांची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी करूनही संबंधित विभाग लक्ष देत नाही. यामुळे संतप्त शेतकरी पिता-पुत्राने आत्महत्येनंतरच कुंभकर्णाची झोप घेणारे जागे होतील का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

महावितरण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
शेतकरी वसंत पाटील व मच्छिंद्र पाटील, दीपक पाटील यांनी सहाय्यक अभियंता अंजली हिंगमिरे व सर्व लाइनमन यांना वेळोवेळी माहिती दिली आहे. लोंबकळणाऱ्या तारांना ताण देण्याची विनंती केली आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी केवळ होकार देतात मात्र प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

वसुलीप्रमाणेच सुविधा द्या 
ज्या पद्धतीने महावितरण सक्तीने वीजबिल वसुली करीत आहे, त्याच पद्धतीने ग्राहकांना चांगल्या सुविधा द्यायला हव्यात. शेतकऱ्यांच्या शेतातील वीजतारा गव्हाच्या पिकावर लोंबकळत आहेत. शेतातील खांब वाकणे, वीजपुरवठा वारंवार बंद होणे, लोंबकळणाऱ्या तारा वर न करणे या विविध समस्या महावितरणने त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

आवर्जून वाचा- नवापूरलगत गुजरातमध्येही बर्ड फ्लू; किलिंग ऑपरेशन सुरू!
 

 

माझ्या गव्हाच्या शेतात चार महिन्यांपासून वीजतारा लोंबकळत आहेत. तारांना ताण देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल घेत नाहीत. गव्हाच्या शेतात रात्री पाणी भरताना थरकाप होतो. गहू कापणीला आहे. हार्वेस्टरने गव्हाची काढणी शक्य नाही. ठिणगी पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यास संबंधित विभागच जबाबदार राहील. 
- मच्छिंद्र पाटील, युवा शेतकरी, कापडणे 

संबंधित शेतकऱ्यांकडे सोमवारी (ता.१५) घरगुती वीजबिल वसुलीसाठी गेली असता त्यांनी शेतात लोंबकळणाऱ्या तारांची समस्या सांगितली. यापूर्वी माझ्याकडे तक्रार आलेली नाही. पण वरिष्ठांना कळवून लवकरच समस्या सोडविण्याचा प्रयत्न आहे. 
- अंजली हिंगमिरे, सहाय्यक अभियंता, महावितरण कापडणे 

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news dhule electricity line problem hung down farm farmers suicide warning