आठवडाभरात भरड धान्य खरेदी केंद्र बंदमूळे शेतकरी अडचणीत 

जगदीश शिंदे
Friday, 8 January 2021

राज्य शासनाने भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करावे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कष्टाला भाव मिळेल, या हेतूने नोंदणी केली.

साक्री ः तालुक्यात मोठा गाजावाजा करून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भरड धान्य खरेदी केंद्र सुरू केले. यात मका, ज्वारी, बाजरी धान्य खरेदी केले जाईल, असे शासनाने आदेश काढले. शासनाच्या सूचनेनुसार तालुक्यातील ९१६ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी, ६० शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी सातबारा, मूळ खाते उतारा, आधारकार्ड, बँक पास बुक आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेतकी संघात नोंदणी केली.

आवश्य वाचा- पाच वर्षांनी एकमेकांना दिले आलिंगन..उपस्थितांच्या डोळ्यात आले पाणी 
 

मात्र, अल्पावधीतच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच भरड धान्य खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप झाला, म्हणून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त होत आहे. केंद्रात ९१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पैकी अवघ्या १४९ शेतकऱ्यांचा मका व थोड्या प्रमाणात ज्वारीची खरेदी झाली. बंद झालेले भरड धान्य खरेदी केंद्र केव्हा सुरू होईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. राज्य शासनाने भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करावे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कष्टाला भाव मिळेल, या हेतूने नोंदणी केली. मात्र, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका संबंधित शेतकऱ्यांना बसला आहे. 

आवर्जून वाचा- मृत्यूची प्रतीक्षा करताय का? जळगावकर संतप्त !

शेतकी संघाचे अध्यक्ष विलास बिरारीस म्‍हणाले, की शासनाने लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करून न्याय द्यावा. याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे शेतकी संघातर्फे रोज विचारणा केली जाते. मात्र, ठोस उत्तर मिळत नाही. रब्बी हंगामात मका खरेदीचे प्रमाण हेक्टरी ४४ क्विंटल होते. मात्र, खरिपात हे प्रमाण हेक्टरी २४ क्विंटल होते. खरेदी केंद्र सुरू करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news dhule grain procurement centers close farmers trouble