
अशा वातावरणात या पिकांना शेतातून काढणे शक्य नाही. शेतात राहिल्याने पावसामुळे नुकसान अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नंदुरबार ः शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा शेतकरी अडचणी सापडले आहेत. गुरूवारी रात्री व आज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मिरची, पपई, केळी व गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गव्हाचे पिक शेतात लोळले आहे. तर जनावरासाठी ठेवलेला चाराही भिजला आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे मिरची व्यापारींची पथारीवर वाळविण्यासाठी टाकलेली मिरची वाळविण्यासाठी एकच धावपळ उडाली होती.
आवश्य वाचा- नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने
गेल्या आठवडाभरापासून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होऊन सर्वत्र गारठा जाणवत आहे. तीन दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी होऊन गुरूवारी (ता. ७) रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सातपासून शिडकावे व नंतर काही परिसरात जोराचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातून तोडलेली लाल मिरची, काढलेली पपई, केळी व पथारीवर पसरवलेली मिरची वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.
मिरची खरेदी बंद
पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची खरेदी बंद केली आहे. मिरची खरेदी करून ती वाळवावी लागते. पावसामुळे ती वाळवता येत नाही. त्यामुळे तिचा रंग काळा पडून ती कुजते. त्यात व्यापाऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दोन दिवसापासून मिरची खरेदी बंद केली आहे.
पपई, केळी, गव्हाचे नुकसान
नंदुरबार, शहादा, तळोदा परिसरात पपई, केळी, गहू व मिरचीचे पिकांचे नुकसान झाले आहे. झाडवर पक्व झालेली ही पिके गळून पडली आहेत. अशा वातावरणात या पिकांना शेतातून काढणे शक्य नाही. शेतात राहिल्याने पावसामुळे नुकसान अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
धडगाव परिसरात पिकांचे नुकसान
धडगाव ः कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन मागील चार दिवसापासून ढगाळ हवामान आणि उष्मा जाणवत असताना गुरुवारी रात्री अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धडगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. जनावरांसाठी बाहेर ठेवलेला चारा (कडबा) भिजला असून पावसासह वारा जास्त असल्याने शेतातील हिवाळी पीक हरभरा, गहू पिके आडवी पडली आहेत. पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहेत. कधी वातावरण बदलाचा फटका पिकांना बसतो, तर कधी अवकाळीचा मार निसर्गचक्रात मात्र शेतकरी पूर्ण अडकला आहे. यावेळी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. हिवाळी पिके जमिनीवर आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना डोक्या वर हात मारण्याची वेळ आली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे