मासेमारी ठरली रोजगाराचे हक्काचे साधन

दीपक कुलकर्णी
बुधवार, 25 एप्रिल 2018

नंदुरबार - ज्या ठिकाणाहून विस्थापित होण्यास एका पिढीने नकार दिला, त्याच सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्यात बाधित साडेचारशे कुटुंबांना मत्स्यव्यवसायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यासाठी सातपुड्यात राहणाऱ्यांनी मासेमारी सहकारी संस्था स्थापन केली असून, लवकरच सरदार सरोवर प्रकल्पात "केज कल्चर' हा मासेमारीचा नवा प्रयोग केला जाणार आहे. यामुळे त्यातून वार्षिक पाच टन मासे मिळणार आहेत.

नर्मदा नदीवर बांधलेला महाकाय जलप्रकल्प म्हणून सरदार सरोवरची ओळख आहे. या प्रकल्पात परिसरातील 32 गावे बुडीत क्षेत्राखाली आहेत. या बुडीत क्षेत्राखालील गावांमधील कुटुंबांना रोजगारासाठी हक्काचे साधन मिळावे, यासाठी महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाने कार्यक्रम निश्‍चित केला. सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत 73 किलोमीटरचा पाण्याचा भाग महाराष्ट्रात आहे. येथे हा मत्स्यव्यवसाय चांगल्याप्रकारे बहरला आहे. सध्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून मासेमारी केली जाते. त्यात ऑगस्ट ते जानेवारीदरम्यान रोज एक ते दीड टन मासे मिळतात; तर उन्हाळ्यात मासेमारी ठप्प असल्यासारखी स्थिती असते.

"केज कल्चर'चा प्रयत्न
सरदार सरोवर प्रकल्पात मासेमारी करताना अडचणी येत होत्या. तसेच, ही मासेमारी अवैध होती. मोठ्या प्रकल्पातील मासे एका भागातून दुसऱ्या भागात जातात. त्यामुळे मासे उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी-अधिक होते. अनेकदा दिवसभरात काही किलो, तर कधी तरी जादा मासे मिळत असत.

शाश्‍वत उत्पादनाची खात्री
या जलप्रकल्पात "केज कल्चर' अर्थात अनेक ठिकाणी पारदर्शक जाळी असलेली पाण्यातील घरे तयार करण्यात येत आहेत. त्यांची रचना चौकोनी हौदासारखी आहे. या हौदाला पक्‍क्‍या भिंती नसून खेळते पाणी राहील, अशी जाळी बसविली जाणार आहे. त्यात मत्स्यबीज सोडले जाईल. त्या जाळीत पाणी खेळते राहील. मात्र, मासे जाळीबाहेर जाऊ शकणार नाहीत. त्याच वरच्या बाजूला एक ड्रम ठेवून त्यात खाद्य टाकले जाईल. प्राधिकरणाच्या अंदाजानुसार यात दर वर्षी पाच टन मत्स्यउत्पादन होणे शक्‍य आहे. यातून शाश्‍वत उत्पादन मिळणार आहे. यातील माशांची धडगाव, मोलगीसह गुजरात, मध्य प्रदेशात विक्री होईल.

कोणते मासे होतील उपलब्ध
या प्रकल्पात कॉमन कार्फ, पेंगासी, रघुकोटला, रोहकोटला, पंकज, मृगल हे मासे पाळले जातात. त्यासाठी लोणावळा येथून माशांसाठी खाद्य आणण्यात येईल.

मासे विक्रीतून भरघोस उत्पन्न मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील याबाबतचे प्रयत्न आणि यश देशाला मार्ग दाखविणारे ठरतील, याची खात्री आहे.
- दत्तात्रेय बोरुडे, अप्पर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार

सध्या पाच संस्थांच्या माध्यमातून मासेमारी सुरू आहे. नजीकच्या काळात "केज कल्चर' सुरू झाल्यावर चांगले परिणाम दिसतील, अशी अपेक्षा आहे.
- चेतन साळवे, कार्यकर्ता, नर्मदा बचाव आंदोलन

Web Title: fishing employment cage culture