आठशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ल्यावर पर्यटकांची रीघ   

एल. बी. चौधरी
Saturday, 23 January 2021

आठशे वर्षापूर्वीच्‍या सुवर्णगिरी किल्ला पर्यटकांना खुणावतोय. त्‍याची डागडुजी झाल्याने पर्यटकांचा ओघ सुरू झाला.

सोनगीर ः सुमारे २५ हजार लोकवस्तीचे गाव असून पर्यटनाच्या दृष्टीने गाव झेप घेत आहे. येथील वैभवशाली इतिहासाचा मूक साक्षीदार असलेला, आठशे वर्षापूर्वीच्‍या सुवर्णगिरी किल्ला पर्यटकांना खुणावतोय. त्‍याची डागडुजी झाल्याने पर्यटकांचा ओघ सुरू झाला असला तरी त्यास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी होत आहे. 

आवश्य वाचा- अफगाणिस्तानमध्ये घबाड सापडले आणि गुरूजी मोहात अडकले; मग काय, जे व्हायचे होते तेच झाले! 
 

तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या विकासनिधीतून विविध पॉइंटच्या ठिकाणी पायऱ्या बांधकाम, संरक्षक रेलिंग, प्लास्टर, पिण्याचे पाणी, रस्ता बनविणे, किल्ला व पायऱ्यांवर संरक्षक भिंत व संरक्षककठडे बांधणे, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, काँक्रीट बाक आदींचे काम झाले आहे.

किल्ल्यावर एतिहासीक अवशेष 

किल्ल्यावरील सासू-सुनेची विहीर, सभागृह, तोफा उडविण्याची जागा, भव्य दरवाजा, स्नानगृह, दही जमविण्याचे पात्र यांचे अवशेष शिल्लक आहेत. तत्कालीन पाणीपुरवठा व्यवस्था नामशेष झाली आहे. इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले अवशेष पाहण्यासाठी नेहमीच पर्यटक येतात. चार वर्षांपूर्वी तीस लाख रुपये खर्च करून रोषणाई व पायऱ्या बांधल्यानंतर किल्ल्याने अक्षरशः कात टाकली. 

किल्याभवती निसर्गरम्य ठिकाण 
किल्ल्याजवळच गुरुगोविंद महाराज मंदिर, त्यालगत पाझर तलाव, गावाच्या दक्षिणेस निसर्गरम्य वातावरणात सोमेश्वर मंदिर, दोन किलोमीटर अंतरावर जामफळ धरण, स्काऊटहब, मारुती मंदिर, पाच किलोमीटरवर सोनवद धरण व त्यालगत भवानी मंदिर, तीन किलोमीटरवर चैतन्यवन आदी पर्यटनस्थळे आहेत.

वाचा- धुळ्यात व्यापाऱ्यांवर ‘एलबीटी‘चे भूत पुन्हा अवतरले 
 

विकास झाल्यास पर्यटनाला चालणार मिळणार

किल्याचा तसेच पर्यटनाच्या उद्दीष्टाने येथे विश्रामगृह होणे आवश्यक आहे. तसेच सुवर्णगिरीस पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन पुरेसा विकास निधी मिळावा, सोमेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळावा व तेथे विकासकामे व्हावीत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

परिसरात अनेक धार्मिक स्थळे

सोनगीर येथे सर्व धर्मांचे मंदिर, प्रार्थनास्थळ आहेत. गावाची प्रगतीची झेप ग्रामस्थांच्या परिश्रमाचे प्रतीक आहे. येथे महादेव, मारुती, श्रीराम, शनिदेव, बालाजी, श्रीकृष्ण, गणपती, विठ्ठल - रखुमाई तसेच दुर्गादेवी, कालिकादेवी, जगदंबा देवी, संतोषी माता, मरीआई, महालक्ष्मी, जागमाता, सिध्दमाता, सप्तशृंगी देवी, साईबाबा आदींसह स्वातंत्र्य संग्राम लढ्यात योगदान असलेले गुरुगोविंद महाराज तसेच त्यांच्या शिष्य परंपरेतील केशवदत्त महाराज, मधुसुदन महाराज व नुकतेच जीर्णोद्धार झालेले प्रणामी मंदिर, तपोभूमी धाम आदी सुमारे साठ मंदिरे आहेत. 

धुळे

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fort marathi new songire dhule tourists flock historic suvarnagiri fort