पत्नीच्या उत्तरकार्याच्या दिवशीच पतीवर अंत्यसंस्कार 

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना जैताणेतील न्याहळदे परिवारात घडली होती. तेव्हाही पत्नीच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी पतीनेही जगाचा निरोप घेतला होता. सारजाबाई न्याहळदे यांच्या निधनानंतर चारच दिवसात त्यांचे पती तुकाराम न्याहळदे यांनी जगाचा निरोप घेतला होता. दोन महिन्यात एकाच गल्लीतील पती-पत्नीच्या समर्पणाची ही दुसरी घटना आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सुभद्राबाई रतन न्याहळदे (वय, 68) व रतन दोधु न्याहळदे (वय, 78) या दाम्पत्याने दहा दिवसांच्या अंतराने जगाचा निरोप घेतल्याने पत्नीच्या उत्तरकार्याच्या दिवशीच पतीवर अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी प्रसंग मंगळवारी जैताणेतील न्याहळदे परिवारावर ओढवल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना जैताणेतील न्याहळदे परिवारात घडली होती. तेव्हाही पत्नीच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी पतीनेही जगाचा निरोप घेतला होता. सारजाबाई न्याहळदे यांच्या निधनानंतर चारच दिवसात त्यांचे पती तुकाराम न्याहळदे यांनी जगाचा निरोप घेतला होता. दोन महिन्यात एकाच गल्लीतील पती-पत्नीच्या समर्पणाची ही दुसरी घटना आहे.

एक फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास सुभद्राबाई न्याहळदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. दहाव्या दिवशी रविवारी (ता.10) दशक्रिया विधी, तर बाराव्या दिवशी मंगळवारी (ता.12) त्यांचे उत्तरकार्य करण्याचे न्याहळदे परिवाराने ठरवले होते. परंतु उत्तरकार्याच्या पूर्वसंध्येलाच सोमवारी (ता.11) रात्री साडेआठला रतन न्याहळदे यांनी जगाचा निरोप घेतल्याने आईच्या उत्तरकार्याच्या दिवशीच बापावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ पावबा न्याहळदे, केवबा न्याहळदे, देवबा न्याहळदे या तिन्ही मुलांवर मंगळवारी (ता.12) आली.

देवबा न्याहळदे यांनी आईला, तर केवबा न्याहळदे यांनी वडिलांना अग्निडाग दिला. रतन न्याहळदे यांनी सुमारे 20 वर्षे सालदारकी केली. त्यानंतर शेळ्या-मेंढ्या घेऊन मेंढपाळाचे काम केले. काही वर्षांपूर्वी शेती घेऊन ते स्थिरावले होते. सुभद्राबाई यांनीही मोलमजुरी व काबाडकष्ट करून दोन मुली व तीन मुले अशा पाच अपत्यांचा सांभाळ करत संसाराचा गाडा ओढला. पण दोघांचाही दहा दिवसांच्या अंतराने अचानक मृत्यू झाल्याने जैताणेत हळहळ व्यक्त होत आहे. येत्या शुक्रवारी (ता.15) दोघांचेही एकत्रित उत्तरकार्य करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर ओढवली आहे.

Web Title: Funeral on husband's day on the wife's last rituals in Dhule

टॅग्स