महिला ढोल-ताशा पथकांचा थरार ठरतोय आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

आम्ही गेल्या महिनाभरापासून सराव करत होतो. सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरवात झाली. दिवसभरात जवळपास तीन वादन आम्ही करत आहोत. जवळपास दिवसभर वादन करूनही आमच्यातील ऊर्जा कमी होत नाही. 
- अमी छेडा, सहस्रनाद ढोल-ताशा पथक

नाशिक - महिनाभरापासून शहरातील ढोल-ताशा पथकांना गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. ती अखेर सोमवार(ता. २)च्या प्रतिष्ठापनेने पूर्ण झाली. त्याचबरोबर शहरात ढोल-ताशा पथकांचा नादही घुमू लागला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात महिला ढोल-ताशा पथकांचा थरार हे प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. ताल व लयबद्ध वादनाने ढोल-ताशा पथक लक्षवेधी ठरत आहे.

बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ ढोल-ताशांनी दुमदुमणारा आसमंत आणि त्याच्यावर तरुणाईने धरलेला ठेका यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. ढोल-ताशांचा एकच जल्लोष आणि यात विशेष करून महिला पथकांचा असणारा सहभाग हा पारंपरिक संस्कृतीला सलामी देणारा, सामाजिक ऐक्‍य जपणारा ठरत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी असणारी गर्दी, गणपती बाप्पा मोरया आणि ढोल-ताशांचा गजर एकंदरीतच वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित करत आहे. 

या पथकांत वकील, इंजिनिअर, तर बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थिनी पुरुषांच्या बरोबरीने बारा ते पंधरा किलो वजनाचे ढोल उचलून चार ते पाच तास वाजविण्याचे कसब दाखवत आहेत. दैनंदिन कामातून वेळ काढून अनेक महिला आता आपली कला जोपसताना दिसत आहेत. ढोल वाजविताना तल्लीनतेने धरलेला ठेका आणि नाचत, उत्साहात न थकता वाद्य वाजविण्याचा त्यांचा हा जोश, वेगळेपणा साऱ्यांनाच थक्क करणारा असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Women Dhol Tasha