कृषी कायद्याप्रश्नी मागण्यांचे काँग्रेसने दिले राज्यपालांना निवेदन

ज्ञानेश्वर सोनवणे
Thursday, 4 February 2021

केंद्र सरकारने आणलेले शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द करावेत, तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात कायमस्वरूपी आदिवासी रहावे

साक्री : तालुक्यासह कृषी कायद्याप्रश्नी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निवेदन दिले. राज्यपाल कोशारी हे आज बारीपाडा ता.साक्री येथे आले असता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्याची भेट घेत हे निवेदन दिले. 

वाचा- धुळे जिल्ह्यातील 'डीपी' प्रश्‍नी शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी 
 

यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने आणलेले शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द करावेत, तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात कायमस्वरूपी आदिवासी रहावे, पेसा क्षेत्रात गौण खनिजाचे दगड, वाळू, मातीचा अधिकार ग्रामसभेला दिले आहेत परंतु त्याची ग्रामीण भागात अंमलबजावणी होत नाही ती करावी, कबऱ्याखडक धरण वीस वर्षांपासून बांधले आहे परंतु त्याची पाटचारी झालेली नाही ती करण्यात यावी, तसेच मालनगाव व लाटीपाडा धरणाच्या पाटचारीला 40 वर्ष झाले त्यावरील दुरुस्ती व पूल दुरुस्ती करावी तसेच ग्रामपंचायत काकडदे व टेंभा यांचे विभाजन करावे आदी मागण्यांचे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल कोशारी यांना दिले.

आवर्जून वाचा- नदीच्या पूलावरून तरुण उडी मारणार; तोच देवदूत म्हणून पोलिस आला, आणि वाचविले प्राण  
 

यावेळी माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी.एस.अहिरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते धीरज अहिरे, विश्वास बागुल, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सदस्य रमेश गांगुर्डे, शांताराम कुवर, पंकज सूर्यवंशी, धुडकू भारुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor marathi news dhule congress made statement regarding governors agriculture act