
बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना डावलून तरुणांना प्राधान्य दिले आहे. तरुणांनी मिळालेल्या संधीचे सोनं करणे आवश्यक आहे.
नवापूर : गावविकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू पाहणाऱ्या सक्षम, सुशिक्षित युवकांच्या हाती राजकारणाची धुरा देण्यावर आता ग्रामस्थांची मानसिकता दिसून येत आहे. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच लागला. या निकालात बहुतांश नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तरुण आहेत.
आवश्य वाचा- निवडणूकीत पराभूत झाला, पण निराश नाही झाला; दुसऱ्या दिवशी न सुटणारा प्रश्न त्याने दोन तासांत सोडविला
धुडीपाडा व सागाळी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर बारा ग्रामपंचायतींपैकी काहींचे प्रभाग बिनविरोध झाले आहेत. या निकालात मातब्बर उमेदवारांना मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. यामुळे मातब्बर राजकारण्यांना चिंतन, तर नव्याने राजकारणात येणाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करायला लावणारा हा निकाल आहे.
दिग्गजांचा पराभव
पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कोकणी यांच्या विकास पॅनलचा सामाजिक गावपरिवर्तन पॅनलने पराभव केला. नवीन नऊ सदस्य विजय झाले आहेत. कोठडा ग्रामपंचायतीतून पंचायत समिती सदस्यांच्या पॅनलमधील केवळ मुलगा राहुल गावित विजयी झाला, तर त्यांची पत्नी रशीला यांचाही पराभव झाला. धनराट ग्रामपंचायतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व माजी सरपंच भानुदास गावित, शेतकरी सहकारी संघाचे माजी उपाध्यक्ष शिवाजी गावित यांचा पराभव झाला. वडकळंबी ग्रामपंचायतीतून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती एम. एस. गावित यांच्या पत्नी ऊर्मिला यांचा पराभव झाला. या निवडणुकीत मातब्बर व्यक्तींचा व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पराभव झाला. नवापूर तालुक्यातील ग्रामीण भाग पूर्णपणे आदिवासी म्हणून ओळखला जातो.
वाचा- सरपंच आरक्षण अन् निवडीची उत्सुकता
पेसा कायद्यांतर्गत गावात मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळतो. परिवर्तनाशिवाय गावाची प्रगती होणार नाही. यामुळेच बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना डावलून तरुणांना प्राधान्य दिले आहे. तरुणांनी मिळालेल्या संधीचे सोनं करणे आवश्यक आहे. ज्या विश्वासाने तुम्हाला लोकप्रतिनिधी केले, त्या विश्वासाला पात्र ठरावे लागेल; अन्यथा जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ मतदारांवर येऊ नये म्हणजे झालं, अशी प्रतिक्रिया मतदार देत आहेत. चौदापैकी नऊ ग्रामपंचायतींवर काँग्रेस, तर राष्ट्रवादीने कोठडा ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. तर भाजपने सरपंचपदाची निवड झाल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे सांगून उत्सुकता वाढवली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे