
पार्टी कोणत्याही उमेदवाराची असो काही जण प्रत्येक ठिकाणी दिसतात. निवडणूक पक्षविरहित असली, तरी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक लढवित आहेत.
सोनगीर : ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे तालुक्यात सर्वच उमेेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचार करीत मतदारांमध्ये चिन्ह ठसविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सामिष भोजनावर ताव मारला जात आहे. परिणामी, सर्वत्र ढाब्यांवर गर्दी दिसून येत आहे. सोशल मीडियावर अक्षरशः प्रचाराचा मारा होत आहे. दरम्यान, चौकाचौकांत पोस्टर्समुळे वातावरण तापले आहे.
आवर्जून वाचा- गेलेले पैसे, दागीने परत मिळाले म्हणून आईच्या एका डोळ्यात आनंद; तर दुसऱ्या डोळ्यात मुलाचे दुःख !
मतदारांना चिन्ह लक्षात राहावे, म्हणून पत्रके, झेंडे, पोस्टर्स, गळ्यात चिन्हांकित मफलर झळकत आहेत. उमेदवार प्रचाराचे मोबाईलवर शूटींग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. घरोघरी जाऊन काय काम करणार याची जंत्रीच उमेदवार देत आहेत. तालुक्यात सहा ग्रामपंचायती व १३० उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर ६६ ग्रामपंचायतीच्या २३६ प्रभागांतील ५६४ जागांसाठी निवडणूक होत असून, एक हजार ३६७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहेत.
रंगू लागल्या पार्ट्या
प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात पार्ट्या सुरू झाल्या आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीत काहींची मजा झाली असून, पार्टी कोणत्याही उमेदवाराची असो काही जण प्रत्येक ठिकाणी दिसतात. निवडणूक पक्षविरहित असली, तरी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक लढवित आहेत. वरिष्ठ नेते प्रत्यक्ष प्रचार किंवा अन्य कोणतीही मदत करीत नसले, तरी प्रत्येक गावाच्या निवडणुकीकडे लक्ष आहे. ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी मिळत असला, तरी विकासाची गंगा वाहत आहे, असे एकही गाव नाही.
आवश्य वाचा- एसटीचा पॅकेज टूर..दोन दिवस फिरा शनिशिंगणापूर, वेरूळलेणी अन् भद्रामारोती
योग्य उमेदवार निवडून येणे गरजेचे
दरम्यान, गावातील रस्ते पाच वर्षेही टिकत नाहीत. घाणीचे साम्राज्य कायम, शौचालय असूनही बाहेर शौचास जाणारे आहेतच. त्यामुळे निधी वाढला तसा गैरव्यवहार वाढला आहे. जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग होण्यासाठी योग्य उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे