नंदूरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

धनराज माळी
Thursday, 14 January 2021

साहित्यासह खासगी वाहनांद्वारे मतदान केंद्रावर पोचविण्यात आले. शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होईल.

नंदुरबार ः जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ( ता. १५) मतदान होत आहे. त्यासाठी तालुका स्तरावरून तहसीलदारांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व मतदान केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी गुरुवारी (ता. १४) सकाळपासूनच मतदान केंद्रावर जाण्यासाठी आले होते. त्यांनी नोंदणी करून व मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रावर वाहनाने रवाना झाले. मतदान शांततेत व्हावे, म्हणून बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारीही रवाना झाले. 

आवश्य वाचा- धिंडरा खाईल्या नी..मतदान करी या !
 

जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी २२ ग्रामपंचायती माघारीच्या दिवशी बिनविरोध झाल्या. केवळ ६४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यासाठी एक लाख १३ हजार मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यात २१२ मतदान केंद्रे असून, जिल्ह्यातील एकूण ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

 

नंदुरबार तालुक्यातील सात, शहादा २१, तळोदा सात, धडगाव १६, नवापूर १२, तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. सुमारे २०० प्रभागांत एक हजार २२९ उमेदवार रिंगणात आहेत. नियुक्त मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी तालुका स्तरावर बोलावून त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. नंतर मतदान साहित्यासह खासगी वाहनांद्वारे मतदान केंद्रावर पोचविण्यात आले. शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होईल. मतदान केंद्रांसह गावांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

वाचा- 'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा ! 
 

शहादा येथे तयारी पूर्ण 
शहादा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा ७७ केंद्रांवर केंद्राध्यक्षांसह ३८५ कर्मचारी तहसील कार्यालयातून सकाळी साहित्य घेऊन वाहनाने मतदान केंद्रावर रवाना झाले. शहाद्याचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे पोलिस निरीक्षक एम. रमेश, उपनिरीक्षक नीलेश वाघ, विक्रांत कचरे, गोपनीयचे युवराज पाटील, ८६ कर्मचारी, ३४ होमगार्ड, म्हसावदचे पोलिस निरीक्षक किरण पवार, ४१ कर्मचारी, २० होमगार्ड, सारंगखेड्याचे निरीक्षक राजेंद्र शिरसाट, कर्मचारी, होमगार्ड एसआरपी व आरसीपी ११ प्लाटून असा सुमारे २२० पोलिस कर्मचारी ८४ होमगार्ड, दहा अधिकारी बंदोबस्तासाठी असतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat marathi news nandurbar administrative preparations complete