सोनगीर ग्रामपंचायतीवर भाजपा काँग्रेसची मिलीजुली सरकार ?

एल. बी. चौधरी 
Tuesday, 2 February 2021

दोन्ही गटांना संधी मिळाल्यानेे विरोधी पक्ष अथवा विरोधी सदस्यच उरला नसल्याने सोनगीरचा विकास अधिक गतीने होईल.

सोनगीर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे म्हणजेच पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांचे वर्चस्व असतांना सरपंच आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठीव म्हणजेच भाजपाप्रणित निघाल्याने अविनाश महाजन यांच्या गटाची संधी हुकली असली तरी उपसरपंचपदी श्री. महाजन यांची निवड स्पष्ट झाली आहे. 12 सदस्यांचा पाठिंबा महाजनांना मिळाल्याने उपसरपंचपदासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपा विचाराच्या गटाला उपसरपंच मिळू शकला नाही. अद्याप सरपंच व उपसरपंच निवडणूक जाहीर झाली नाही तत्पूर्वीच येथील ग्रामपंचायतीवर भाजप व काँग्रेस अशी मिलीजुली सरकार येेईल हे स्पष्ट झाले आहे. 

आवर्जून वाचा- आमचे नगरसेवक विकाऊ नाहीत; शेवटच्या सभेत सभापतीची राजकीय फटकेबाजी  
 

निवडणुकीत विजयी 17 पैकी 13 सदस्य आमचे असल्याचा दावा श्री. महाजन यांनी केला होता. ते 13 सदस्य कायम एक राहिले. एकही सदस्य फुटला नाही. आरक्षणामुळे महाजन गटाला सरपंचपदाने हुलकावणी दिली. अनुसूचित जमातीच्या एकमेव विजयी महिला रुखमाबाई ठाकरे असल्याने त्यांचे सरपंचपद निश्चित झाले आहे. दोन्ही गटातर्फे उपसरपंचसाठी प्रयत्न केला जात होता. मात्र सोमवारी सायंकाळी येथील (कै.) शंकरराव आनंदा महाजन पतसंस्थेत अविनाश महाजन यांच्यासह गटाचे सर्व 13 सदस्यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवडीबाबत चर्चा झाली. तीत उपसरपंचपदासाठी अविनाश महाजन यांना सर्वांनी बिनशर्त पाठिंबा दिला. परिणामी सरपंच भाजपा व उपसरपंच काँँग्रेसचा असे गणित झाले आहे. दोन्ही गटांना संधी मिळाल्यानेे विरोधी पक्ष अथवा विरोधी सदस्यच उरला नसल्याने सोनगीरचा विकास अधिक गतीने होईल हे देखील स्पष्ट झाले आहे. 

आवश्य वाचा-  प्रवासात वृध्दाची अचानक प्रकृती बिघडली; मग काय, एसटी बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेली

सरपंच रुखमाबाई ठाकरे यांचे वडील सीताराम भील हे 35 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांचे भाऊ शामलाल मोरे हे गेल्या पंचवार्षिक काळात जिल्हा परिषद सदस्य होते. गावाचा विकास हेच माझे ध्येय आहे. आणि हे जनतेला लवकरच दिसेल. अशी प्रतिक्रिया श्रीमती रुखमाबाई ठाकरे यांनी दिली. अविनाश महाजन आधी पंचायत समिती सदस्य, गेल्या पंचवार्षिक काळात त्यांची पत्नी योगिता महाजन सरपंच व आता ते उपसरपंच असा राजकीय प्रवास आहे. सरपंच व सर्वांच्या सहकार्याने गावाची प्रगती करून दाखवू अशी प्रतिक्रिया अविनाश महाजन यांनी दिली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat marathi news songire dhule BJP Congress in power together