साहित्यिकांच्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्यांच्या दुःखाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

नाशिक - यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले, हे गैर आहे. साहित्यिकांनी समाजाचे दुःख साहित्यात प्रखरपणे मांडत पीडितांच्या व्यथा, यातना सर्वांसमोर आणल्या पाहिजेत; परंतु यंदाच्या साहित्य संमेलनात निमंत्रण रद्दच्या घटनेनंतर बेअब्रू झाल्यानंतर साहित्यिकच प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या दुःखाचा वापर करतात, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी येथे साहित्यविश्‍वावर आसूड ओढले.

अमृतमहोत्सवानिमित्त मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या होरायझन अकादमी सभागृहात डॉ. साळुंखे यांचा "बळिराजा सन्मान' पुरस्कार देऊन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. "मविप्र'च्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार अध्यक्षस्थानी होत्या. "सकाळ'चे संपादक श्रीमंत माने, गोपाळ पाटील, प्रा. अर्जुन कोकाटे, प्रा. उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

माणूस म्हणून माणसाला प्रतिष्ठा देण्याऐवजी वापरून फेकून दिले जाते. हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी अगोदर निमंत्रण दिले असते, तर शेतकऱ्यांप्रति संवेदना आहे, असे स्पष्ट झाले असते, अशा परखड शब्दांत डॉ. साळुंखे यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.

शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये
व्यवसाय-उद्योग चालावेत म्हणून पगारवाढीतून वीस टक्के लोकांच्या हातात प्रचंड पैसा दिला जातोय. अशावेळी शेतीवर अवलंबून असलेल्या 80 टक्के लोकांकडे पाहण्याची गरज नाही, असे मानले जाते. त्यातून देशात दरी तयार होत असून, विषमता वाढत आहे. देशाच्या ऐक्‍यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी शेतकरी कुटुंबातून आलेल्यांनी आणि शिक्षण, ज्ञान, प्रतिष्ठा, सत्ता, आर्थिक क्षेत्रात संधी मिळालेल्यांनी मागे वळून पाहावे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी. अडचणीतील माणसांना मदत करावी; तरच मार्ग निघेल, प्रकाश येईल, अंधार नाहीसा होईल हे ध्यानात ठेवून आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असेही आवाहन त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A H Slunkhe Talking in Horizon Academy