
हेअर सलून चालकाला आधुनिकतेचे भान ठेवून नवनवीन केशरचनेचा अभ्यास ठेवावा लागतो. परिणामी, सलून व्यवसाय केवळ तरुणांचा असल्याचे बोलले जात आहे.
सोनगीर : तरुणाईच्या चित्रविचित्र केशरचनेमुळे वडील व पालकांत खडाजंगी उडत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. डोक्यावर मध्यभागी केसाचे झुबके व दोन्ही बाजूला किंवा एकाच बाजूला पट्टा अशी केशरचना (हेअरस्टाइल) तरुणाईत लोकप्रिय झाली आहे. युवा वर्गात वेगवेगळ्या केशरचनेच्या आकर्षणामुळे हेअर सलून चालकांनाही अपडेट राहावे लागत असून, सध्या तीनशेहून अधिक केशरचना प्रसिद्ध आहेत. त्यासाठी पैसेही अधिक मोजावे लागत आहेत.
आवश्य वाचा- पुरणपोळी, बिबडी, मेहरुण बोरांना ‘जीआय’मानांकनाचा प्रस्ताव
आकर्षक केशरचनेमुळे व्यक्तिमत्त्वाचा वेगळा प्रभाव पडतो. प्रत्येकाच्या केशभूषेत थोडातरी फरक असतोच. तरीही पूर्वीपासूनच आपल्या आवडत्या हिरोसारखी केशरचना ठेवण्याची युवावर्गात आवड आहे. मात्र एखादी केशभूषा प्रचंड लोकप्रिय होते. यापूर्वी राजेश खन्नाची ब्रिटल, मिथुन चक्रवर्ती (डिस्को डांसर), आमिर खान (कयामत से कयामत तक), अनिल कपूर (तेजाब), ऋत्विक रोशन (कहो ना प्यार है). ऋषी कपूर (बॉबी), सलमान खान (तेरे नाम), शाहीद कपूर (कमीने) आदींच्या केशरचनेने युवांना वेड लावले होते. गायक सोनू निगम व देसी हिप हॉप तसेच पंजाबी रँप गायक यो यो हनीसिंग यांची केशरचनाही युवा वर्गात लोकप्रिय होती. क्रिकेट टीमचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीची सुरवातीच्या काळातील केशरचना अद्यापही युवा विसरले नाहीत. सैनिक स्टाइल कट गेल्या पंचवीस वर्षांपासून लोकप्रियता टिकवून आहे.
महागड्या केशरचना
डोक्यावर लांब केस व खाली बारीक केस अशी केशरचनेचा शहरासह ग्रामीण भागात सध्या बोलबाला आहे. पन्नास रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत केशरचनेचे दर आहेत. त्यामुळे सलून व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. खेडोपाडी बसथांबा, मुख्य चौकात सलूनच्या अनेक टपऱ्या उभ्या राहत असल्या तरी प्रत्येक दुकानावर नंबर लागलेले असतात.
यंत्राचे आगमन
यंत्रांच्या आगमनामुळे पारंपारिक व्यवसाय हद्दपार होत असताना जे बोटावर मोजण्याइतके व्यवसाय टिकले आहेत त्यापैकी सलून एक आहे. मात्र या व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. वेगवेगळ्या केशरचनेच्या आगमनामुळे हेअर सलून चालकाला आधुनिकतेचे भान ठेवून नवनवीन केशरचनेचा अभ्यास ठेवावा लागतो. परिणामी, सलून व्यवसाय केवळ तरुणांचा असून, पन्नाशीच्या आतच निवृत्त व्हावे लागते.
वाचा- घरावर पाळत ठेवली आणि चोरट्यांनी सायंकाळीच हातसफाई केली
..
नावीन्यपूर्ण व विचित्र केशरचनेचे युवकांना आकर्षण असते. दररोज स्टाइल बदलते. बदलत्या लुकचा अभ्यास सलून चालकालाही असावा लागतो. त्यामुळे व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे.
-योगेश सैंदाणे, लकी हेअरआर्ट, सोनगीर
संपादन- भूषण श्रीखंडे