राज्यातील जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

प्रमोद सावंत
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा दौरा राजकीय नाही. यामुळे राज्यव्यापी दौऱ्यात सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे.

मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा दौरा राजकीय नाही. यामुळे राज्यव्यापी दौऱ्यात सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. राज्यातील जनतेचे भगव्यावर व शिवसेनेवर मोठे प्रेम आहे. आगामी काळात एक भगवा महाराष्ट्र घडवूया', असे आवाहन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी येथे केले. 

येथील बाजार समितीच्या शेडमध्ये झालेल्या सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री. ठाकरे यावेळी भाषण करणार नव्हते. मात्र येथील उत्साह व जनसमुदाय पाहून त्यांनी माईकचा ताबा घेत अवघे चार मिनीट भाषण केले. बारा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांचे येथे आगमन झाले. अवघ्या वीस मिनिटात हा कार्यक्रम आटोपला.

व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, युवानेते वरुण सरदेसाई, आमदार नरेंद्र दराडे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश पाटील, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, मनोहर बच्छाव, प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या ज्योती भोसले, युवानेते अविष्कार भुसे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ आदी व्यासपीठावर होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब अांबेडकर व मिनाताई - बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व केरळमधील पुरात बळी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. ग्रामविकास राज्यमंत्री श्री. भुसे यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याचा उद्देश सांगितला. शिवसेनेच्या तत्वाप्रमाणे ८० टक्के सामाजिक उपक्रम या दौऱ्यात राबविले जात आहे. येथील आरोग्य शिबीरात २० तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले असून तपासणीसाठी दहा स्वतंत्र दालन करण्यात अाले आहे. शेकडो रुग्णांना या शिबीराचा लाभ होईल. शहर व परिसरातील विकासकामाच्या उद्‌घाटनासाठी आदित्य ठाकरे यांनी स्वतंत्र एक दिवसाचा वेळ द्यावा असे साकडे त्यांनी घातले. यावेळी शहर व तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. तरूण व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health care service is important for the people of the state Yuvasena Chief Aditya Thakeray