पुरेसे मनुष्यबळच नाही तर लढणार कसे?

हिरे मेडिकलचा प्रश्‍न : प्रस्ताव मंजुरीलाही नाहक विलंब
dhule
dhuleSAKAL

धुळे : दोन वर्षांतील संसर्गजन्य कोरोना संकटकाळात अपुऱ्या मनुष्यबळावर येथील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने अविरत लढा दिला. त्यावेळी नागरिकांनीही अनेक समस्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर हिरे मेडिकलसह रुग्णालयातील समस्यांबाबत ओरड सुरू झाली आहे. यात वाढती रुग्णसंख्या आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्याने भविष्यात अशा स्थितीशी लढायचे कसे, असा प्रश्‍न व्यवस्थापनापुढे आहे.

हिरे मेडिकल कॉलेजची स्थापनेवेळी विद्यार्थी संख्या ५०, तर खाटा २५० होत्या. त्यानुसार सर्व श्रेणीतील मनुष्यबळ दिले. कालांतराने कॉलेजची पदव्युत्तर सुविधेमुळे विद्यार्थी संख्या दीडशे झाली. तुलनेत ५५० खाटा झाल्या. मात्र, सर्व श्रेणीतील मनुष्यबळ पूर्वीच्या ५० संख्या आणि २५० खाटांच्या तुलने इतकीच आजही आहे. परिणामी, खाटा व रुग्णसंख्या वाढूनही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने किंवा भरती प्रक्रिया न राबविल्याने हिरे मेडिकलसह रुग्णालयास विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सद्यःस्थितीत स्वच्छतेसह रुग्णांचे विविध प्रश्‍न, समस्यांच्या निराकरणासाठी चतुर्थ श्रेणीचे किमान अडीचशे कर्मचारी लागणार आहेत. त्यांची भरती होत नसल्याने व्यवस्थापनापुढे बऱ्याच अडचणी आहेत. यातून आतापर्यंतच्या कुठल्याही राज्य सरकारने हिरे मेडिकलसह रुग्णालयाच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही, की प्रश्‍न हाताळले नाहीत. रुग्णांप्रती संवेदना दर्शविण्यासाठी सरकारने रिक्त डॉक्टरांच्या पदांसह विविध श्रेणीतील मनुष्यबळ उपलब्धतेसाठी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यात स्थानिक पातळीवरील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठीही सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील.

तांत्रिक मंजुरीला विलंब

हिरे मेडिकलसह रुग्णालयातील रुग्ण, नातेवाइकांच्या सोयीसाठी काही खरेदी केली, गरजेनुसार प्रस्ताव दिला तर तो वरिष्ठ पातळीवर, मंत्रालयातही जातो. त्याची तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठी चार- चार महिने लागतात. वाटले तर मागणी प्रस्तावाला मंजुरी किंवा तो अमान्य केला जातो. खरेतर रुग्णहिताचे प्रस्ताव नियमात बसवून विनाविलंब मंजूर व्हावेत, अशी अपेक्षा असते. तसे वरिष्ठ स्तरावर घडत नाही. विलंब टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर तांत्रिक मंजुरी प्रदान होण्यासाठी समिती आहे. तिला तिच्या अधिकाराचा वापर करू देण्यास सरकारने उद्युक्त केले पाहिजे. त्यातील बाह्य हस्तक्षेपावर रोख आणण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत

सोशल वर्कर्स कुठे?

हिरे मेडिकल व रुग्णालयासाठी सरासरी २० हून अधिक सोशल वर्कर्सची भरती झाली आहे, पण ते कार्यक्षेत्रात फारसे दिसून येत नाहीत. काही पुढारपण करत हिंडतात. वास्तविक या रुग्णालयात दहा ठिकाणी सोशल वर्कर्ससाठी टेबल असले पाहिजे. त्या टेबलवर सोशल वर्करची नेमप्लेट हुद्द्यासह असली पाहिजे. जेणे करून जिल्ह्यातून किंवा लगतच्या नंदुरबार, जळगाव, नाशिकच्या सीमेवरील तालुक्यातून, महामार्गावरील अपघातातील रुग्ण आले, तर त्यांना केस पेपर काढण्यापासून पुढील सर्व प्रकारची मदत मिळू शकेल. सोशल वर्कर्सचे ते सरकारने ठरवून दिलेले काम आहे. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. हा विषय हिरे मेडिकल व रुग्णालयाने गांभीर्याने हाताळण्याची गरज व्यक्त होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com