संकट कितीही असो पोलिसांचे मनोधैर्य, मनोबल उंचावलेलेच ! 

निखील सुर्यवंशी
Thursday, 24 December 2020

धुळे जिल्ह्यासह नाशिक विभागातील तीन महिन्यांमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीची माहिती डॉ. दिघावकर यांनी दिली.

धुळे ः चांगले काम केले तरीही किंवा काही कारणाने उणीव राहिल्यास तक्रारी, आरोपांशी सामना करावा लागतो. अडचणी, संकटाशी आम्हालाही लढावे लागते. तरीही पोलिसांचे मनोबल, मनोधैर्य खच्ची होत नसते.

आवश्य वाचा- खेळता खेळता अचानक बालक गायब झाला; आणि समोर आली भयंकर घटना

प्रसारमाध्यमे, पत्रकार हा समाजाचा खरा आरसा आहे. त्याला खरे-खोटे काय ते माहीत असते. त्यामुळे चांगले काम करणाऱ्यांना तो महत्त्वाचा आधार असतो. या बळावर येणारी संकटे, अडचणी, आरोप मोडीत काढण्याचे मनोधैर्य, मनोबल पोलिसांमध्ये टिकून आहे, अशी स्पष्ट भूमिका नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात धुळे जिल्ह्यासह नाशिक विभागातील तीन महिन्यांमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीची माहिती डॉ. दिघावकर यांनी दिली. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रशिक्षणार्थी अधीक्षक पंकज कुमावत, एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत उपस्थित होते. 

डॉ. दिघावकर यांची भूमिका 
डॉ. दिघावकर यांनी पत्रकारांनी विविध विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना म्हणाले, की संघटित टोळ्यांमधील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होत आहे. खासगी सावकारीबाबत तक्रारी झाल्यास कारवाई केली जाईल. गुंड, समाजकंटकांबाबत तक्रार करण्यास सर्वसामान्य घाबरतात. या स्थितीत निनावी अर्ज केले, तर त्याची दखल घेतली जाईल. त्यातील दोषींना तडीपार केले जाईल. गांजा प्रकरणी गुन्हेगारांकडून होणारा पुरवठा, वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला जात आहे. गांजा किंवा गुन्हेगारी प्रकरणात संशयिताला अटकपूर्व जामीन मिळणार नाही, त्याला जामीन मिळू शकणार नाही यादृष्टीने कामकाजावर भर देण्याची सूचना यंत्रणेला दिली. 

वाचा- शहर झगमगणार, दोन कोटीही वाचणार; कसे ? -
 

शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील 
विविध गुन्ह्यांतील संशयितांना शिक्षा होण्यासाठी, हा दरवाढीसाठी प्रयत्नशील आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर गुन्हेगारी, गुन्हेगारांवर नियंत्रणासाठी ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामकाज केले पाहिजे, त्याविषयी योग्य त्या सूचना देत आहे. सोनसाखळी चोर, जबरी चोरी, घरफोडी आदी घटनांमधील सात वर्षांतील सक्रिय गुन्हेगाराची दर १५ दिवसांत तपासणी करणे, त्याला दर १५ दिवसांनी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगणे, त्याचे मित्र किंवा त्याचा वावर कुठे, कसा याची माहिती जाणणे, त्याला बजावलेला समन्स, पंचनाम्यातील साक्षीदार, पंच वेळोवेळी हजर राहतात किंवा नाही आदी प्रक्रियेवर देखरेख अधिकारी नेमणे, त्यात एक हवालदार-एक गुन्हेगार अशी दत्तक योजना राबविण्यास सुरवात केल्याचे डॉ. दिघावकर यांनी नमूद केले. 

जिल्हा पोलिस प्रशासनाला शाबासकी 
दोंडाईचातील मोहन मराठे मृत्यू प्रकरणानंतर सर्व पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणप्रश्‍नी संबंधित विभाग व पोलिस अधीक्षकांच्या समन्वयातून हॉकर्सवर कारवाई करणे आदी सूचना डॉ. दिघावकर यांनी दिल्या. त्यांनी क्राइम डिटेक्शन चांगले, तसेच शस्त्रजप्तीची कारवाई उत्तम असल्याबद्दल जिल्हा पोलिस प्रशासनाची पाठ थोपटली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inspector general of police marathi news dhule ig dr. pratap dighavkar crime review meeting