Latest Marathi News | Dhule Crime : गुंगीकारक औषधांचा साठा जप्त; 2 अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Bachhao, Hemant Patil and action team were present during the investigation of the suspects along with seized drug stocks, Gavathi Katta.

Dhule Crime : गुंगीकारक औषधांचा साठा जप्त; 2 अटकेत

धुळे : एलसीबीच्या येथील पथकाने गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह दोघांना गजाआड केले, तर शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या चिमठाणेतील (ता. शिंदखेडा) तरुणालाही कारागृहाचा रस्ता दाखविला. या कारवाईची पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी प्रशंसा केली. (Intoxicants stock seized 2 arrested Dhule Crime Latest Marathi news)

तौसिफ शाह सलीम शाह (वय २४, रा. ८० फुटी रोड, रमजानबाबा नगर, धुळे), अतुल कन्हय्यालाल राणे (वय २३, रा. गांधी नगर, श्रीनाथ सोसायटी, सुरत, गुजरात) दुचाकीने (एमएच ३९ आरडी १९३९) गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने महापालिका, शिवाजी हायस्कूल परिसरात हिंडत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

त्यांनी पथकाला कारवाईचा आदेश दिला. महापालिका शेजारील बोळीत दोन संशयित दुचाकीसह प्लॅस्टिकची गोणी व दोन बॉक्ससह दिसले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यात गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आढळल्या. त्यांच्याकडून ३० हजारांची दुचाकी व ६४ हजार किमतीच्या बाटल्या, असा एकूण ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हवालदार कमलेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार संशयित दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गावठी कट्टा हस्तगत

साक्री रोडवरील जे. के. ठाकरे चौकापुढे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने पकडले. विजय पांडुरंग माळी (रा. चिमठाणे) असे त्याचे नाव आहे. चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशय बळावल्यावर त्याची पथकाने झडती घेतली. त्यात गावठी कट्टा आढळला.

त्याच्यासह वीस हजार किमतीचा कट्टा पोलिसांनी ताब्यात घेतला. हवालदार सागर शिर्के यांच्या फिर्यादीनुसार संशयित विजय माळी याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, सहकारी अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, संजय पाटील, हवालदार रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के यांनी कारवाई केली.