आमदार दीपिका चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात उमटविला ठसा

dipika-chavhan
dipika-chavhan

सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, सोलापूर विद्यापीठाचे राजमाता अहिल्यादेवी तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे बहिणाबाई चौधरी नामविस्तार करणे, सुवर्ण चतुष्कोणमधील महत्वाचे शहर असलेल्या नाशिकसाठी मुंबई व नागपूरच्या धर्तीवर नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करणे आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे राज्य शासनाने आग्रह धरणे या विषयांचा यामध्ये समावेश आहे. 

आमदार सौ. चव्हाण यांनी विधानसभा नियम १०६ अन्वये ठराव मांडून विधिमंडळाचे या महत्वपूर्ण विषयांकडे लक्ष वेधले. 

आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभा सदस्य म्हणून कामकाज करतांना सभागृहात वेळोवेळी विधिमंडळ आयुधांचा वापर करून शासनाचे लक्ष वेधले आहे. विधिमंडळ कामकाजाबाबतच्या विविध राज्यस्तरीय अहवालांत आणि सर्वेक्षणात आमदार सौ. चव्हाण यांची लोकप्रतिनिधी म्हणून कारकीर्द सभागृहापुढे ठळकपणे पुढे आली आहे. 

प्रत्येक अधिवेशनाप्रमाणे त्यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही बागलाण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष तयारी केली होती. त्यानुसार काल सोमवार (ता.९) रोजी विधानसभा नियम १०६ अन्वये आमदार सौ. चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण विषयांवरील चार अशासकीय ठराव मांडले. 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चिरंतन स्मरणात राहण्यासाठी दादर रेल्वे स्थानकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक' हे नाव देण्याकरिता राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा. या विषयावरील पहिला ठराव क्र.७३ मांडण्यात आला आहे. सोलापूर विद्यापीठाचा 'राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 'बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याची राज्यातील जनतेची मागणी असल्याने राज्य शासनाने हा नामविस्ताराचा निर्णय तातडीने घ्यावा, असे ठराव क्र. ७४ मध्ये मांडले आहे. राज्याच्या सुवर्ण चतुष्कोणमधील नाशिक हे एक महत्वाचे शहर असल्याने शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एम. एम. आर. डी. ए. मुंबई व नागपूर सुधार प्रन्यासच्या धर्तीवर नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करून या प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी शिफारस ठराव क्र. ७५ द्वारे करण्यात आली आहे. 

राज्यात व देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण कार्य महाराष्ट्रातील व देशातील जनतेला प्रेरणादायी आहे. महिलांच्या कल्याणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. अशा या थोर व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा. अशी शिफारस शासनास ठराव क्र. ७६ अन्वये करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अधिवेशनात या चारही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करीत आमदार सौ. चव्हाण यांनी याप्रश्नी शासनाकडील अपेक्षित कार्यवाहीसाठी प्रयत्न केले आहेत. आता शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com