उद्योगवाढीसाठी हवे आयटी पार्क

apeksha-it
apeksha-it

नाशिकचे वातावरण, उपलब्ध पायाभूत सुविधा यामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचा गेल्या काही वर्षांचा झपाट्याने विकास झाला आहे; परंतु आयटी क्षेत्र वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासकीय उदासीनता गतिरोधकाचे काम करीत आहे. याचेच कारण गेल्या मोठ्या कालावधीपासून नाशिकमध्ये मोठी आयटी कंपनी दाखल झालेली नाही. दुसरीकडे व्यावसायिक अभ्यासक्रमांत आयटी, कॉम्प्युटर यासह संगणक शाखांतून अभियांत्रिकी, बीसीए, बीसीएस यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून दर वर्षी हजारो विद्यार्थ्यांना नोकरीचा शोध घ्यावा लागत आहे. त्यासाठी मुंबई, पुण्यासह बेंगळुरू व अन्य शहरांत खेट्या माराव्या लागताहेत. त्यामुळे आयटी उद्योगाच्या वाढीसाठी आयटी पार्क व्हायला हवा. नाशिकची ओळख आयटी हब अशी होत असताना आजच्या डिजिटल युगात शंभर टक्‍के नाशिककरांना, विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक साक्षर करणे हेही भविष्यात आव्हान असणार आहे. 

नाशिकमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या लक्षणीय आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा विशेषत: युवतींचा कल संगणकीय शाखांकडे असल्याचे गेल्या काही वर्षांचे चित्र आहे. त्यामुळे दर वर्षी संगणकीय शाखांतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत नोकरी देणाऱ्या कंपन्यांची संख्या पुरेशी नाही. नाशिकला नोकरी मिळत नसल्याने युवकांना अन्य शहरांत चाचपणी करावी लागते. नाशिकमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. त्यामुळे येथील कौशल्य ओळखून नाशिकमध्ये आणखी काही आयटी कंपन्या आल्या, तर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. सध्या ईएसडीएस, डब्ल्यूएनएस, डेटामेट्रिक्‍स यांसह अनेक आयटी कंपन्यांच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते आहे. ईएसडीएसने नाशिकसह मुंबई व विदेशातही आपला कार्यभार पसरविलाय. 

चांगल्या कामगिरी करणाऱ्या कंपन्या नाशिकमध्ये कार्यरत आहेत, परंतु त्यांची संख्या तोकडी असल्याने आयटी क्षेत्राचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही. आयटी पार्कचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनस्तरावर आयटी कंपन्यांसाठी जागा राखीव ठेवण्यासोबत तेथे आयटी पार्कची उभारणी करत कंपन्यांना कामासाठी योग्य दरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी माहिती होत राहिलेली आहे; परंतु त्यावर ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. परवानग्यांसाठी होणाऱ्या ससेहोलपटीमुळे या क्षेत्रात प्रशासनाविषयी नकारात्मक मत निर्माण झाले आहे.

आयटी हब म्हणून नाशिकची ओळख निर्माण करायची असेल, तर सर्वप्रथम विमानसेवेने नाशिकला देशाशी जोडणे महत्त्वाचे ठरेल. नाशिकमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास अनेक कंपन्यांचे अधिकारी नाशिकला सहजरीत्या येऊ शकतील. चर्चा करून आपल्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करू शकतील. याचा परिपाक म्हणून कंपन्या नाशिकमध्ये आपली कार्यालये आणतील. आयटी क्षेत्राच्या विकासासाठी योजना राबविण्यासोबत कर व अन्य बाबींमध्ये सूट देण्याचीही आवश्‍यकता आहे. 

कुंभथॉनसारख्या चळवळीमुळे युवकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यात यश आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये नाशिकमधून अनेक स्टार्ट अप्स सुरू झाले; परंतु गुंतवणूकदारांच्या कमतरतेमुळे यापैकी काही स्टार्ट अप्स दीर्घकाळ तग धरू शकले नाहीत. आयटी क्षेत्राच्या विकासाचा विचार करताना स्टार्ट अप्सला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण आणखी क्रमप्राप्त ठरेल. स्टार्ट अप्स उभारणीसाठी मार्गदर्शन केंद्र उभारल्यास युवकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शासनस्तरावर गुंतवणूकदारांचा या नवउद्योजकांशी संवाद घडवून आणल्यास भांडवलाचा प्रश्‍न मिळेल. नव्याने सुरू झालेल्या या स्टार्ट अप्समधून अन्य चार लोकांना रोजगार मिळू शकेल. 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग विकासाचा विचार करताना डिजिटल इंडियातील प्रत्येक नाशिककर हा संगणक साक्षर असणे आवश्‍यक राहील. सध्याच्या युवा पिढीला स्मार्टफोनचे ज्ञान आहे; परंतु ग्रामीण भागासह शहरातील काही भागात संगणकाविषयी अपेक्षित ज्ञान नाही. कॅशलेसकडे वाटचाल करताना संगणक साक्षरतेचे प्रमाण नाशिकमध्ये वाढविणे, हेदेखील भविष्यातील आव्हान असणार आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बऱ्यापैकी पारदर्शी व्यवहार आवडतात. अशावेळी नाशिक हे जर आयटीसाठी जगात खुले करायचे असेल, तर त्यासाठी आवश्‍यक सगळ्याच गोष्टी पुरविल्या जाणे आवश्‍यक आहेत. जगाच्या तोडीचे बनण्यासाठी कार्यशाळा, व्याख्याने, प्रात्यक्षिक होणे आवश्‍यक आहे. नाशिकमध्ये ज्या छोट्या छोट्या आयटी कंपन्या आहेत त्यांची एकत्र मिळून को-क्रिएशन पद्धतीने काम होणे अपेक्षित आहेत. पुढे डिजिटल इंडिया होतांना हे नाशिकसाठी खूप फायद्याचे ठरेल.
- गिरीश पगारे, संचालक, कुंभथॉन 

नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने विमानसेवा ही खूप महत्त्वाची आहे. जगभरातील आयटी कंपन्यांशी तत्काळ संवाद साधण्याच्या दृष्टीने ही सेवा असणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातील व्यवसायवृद्धीचे नियोजन करण्याकरिता लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.  
- पीयूष सोमाणी

माहिती तंत्रज्ञानाचे जाळे व त्याचा दिवसेंदिवस वाढता विस्तार लक्षात घेता नाशिकच्या विकासासाठी आयटी पार्क, त्याला सोयीसुविधा व त्या दृष्टीने दळणवळणाची साधनं उपलब्ध करणे हे महत्त्वाचे असणार आहे. त्या दृष्टीने आता प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.
- मानस गाजरे

‘आयटी’चा विस्तार हा टायर वन आणि टायर टू सीटीजमध्ये विभागला गेला आहे, असे म्हणायला हरकत नाही. पुण्यात आयटी कंपन्यांचे जाळे ओव्हरफ्लो होतांना नाशिकसारख्या शहरात ते पसरविण्याची गरज होती. नाशिकमध्ये आयटीसाठी खूप मनुष्यबळ आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे. शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय ते शक्‍य नाही. 
- प्रमोद गायकवाड 

मंत्रभूमी ते औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकनगरीत सध्या जागेचा विचार केला, तर मोठ्या कंपन्या जागा, योजनांमुळे येण्यास तयार नाहीत. पण, आयटीला जागा तशी कमी लागते आणि शिवाय यातून मिळणारा रोजगार आणि त्याचे उत्पन्न पाहता नाशिकमधील गुंतवणूकवाढीला चालना मिळेल. जाणीवपूर्वक आयटी पार्क शहरात आणले, तर क्रयशक्तीदेखील वाढेल आणि शहरांचा विकासही ओघाने होईल. 
- धनंजय बेळे, अध्यक्ष, नाशिक आयटी असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com