जैताणे ग्रामीण रुग्णालयासाठी 'नाहरकत' आवश्यक

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह खारीखाणमधील रुग्णालयासाठी पर्यायी जागेची पाहणी केली. गट क्रमांक ६५४/१ मधील गावठाणच्या सोळा एकर जागेपैकी नेमकी कोणती पाच एकर जागा मोजमाप करून ताब्यात घ्यायची ते निश्चित करण्यात आले.

ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव...

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह खारीखाणमधील रुग्णालयासाठी पर्यायी जागेची पाहणी केली. गट क्रमांक ६५४/१ मधील गावठाणच्या सोळा एकर जागेपैकी नेमकी कोणती पाच एकर जागा मोजमाप करून ताब्यात घ्यायची ते निश्चित करण्यात आले.

निजामपूर-जैताणे ते लामकानी-दोंडाईचा रोडवरील खारीखाणमधील घरकुलांपासून पन्नास फूट जागा सोडून पश्चिमेकडील पाच एक जागा देणेबाबत काल (ता.२६) ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत चर्चा झाली. डॉ. चित्तम यांच्याकडे सरपंच संजय खैरनार यांनी जागेच्या निश्चितीकरणाचे पत्र सुपूर्द केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम व सरपंच संजय खैरनार यांच्यासह उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, गणेश देवरे, भालचंद्र कोठावदे, लिपिक यादव भदाणे, रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. चव्हाण, ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

सुमारे सात विभागांचा 'नाहरकत' दाखला आवश्यक...
ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा होण्यासाठी धुळे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना विभाग, सिंचन विभाग, वन विभाग, नगरभूमापन विभाग व भूमिअभिलेख विभाग अशा एकूण सात विभागांच्या नाहरकत दाखल्यांची गरज असून पुढील आठवड्यात ते मिळण्याची शक्यता असल्याचे डॉ. चित्तम यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. ग्रामपंचायतीने यापूर्वीच २६ जानेवारीच्या ग्रामसभेत रुग्णालयाच्या पाच एकर जागेचा ठराव मंजूर केला होता. सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र कोठावदे सूचक तर ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार अनुमोदक होते. आगामी काळात उर्वरित सर्व सातही विभागांची 'नाहरकत' प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर जागेचे मोजमाप होऊन जागेचा ताबा मिळताच कामाला सुरुवात होणार आहे.

जनहितासाठी कागदोपत्री सोपस्कार कमी करावेत...
अनेकदा जनहिताची कामे ही कागदोपत्री सोपस्कारात अडकून पडतात. जमीन अधिग्रहण करताना, विविध विभागांकडून नाहरकतीचे दाखले मिळवताना अडवणूक होणार नाही. याची काळजी शासनाने घेणे गरजेचे आहे. अशावेळी ग्रामस्थांनीही जातीपातीचे, गटातटाचे संकुचित राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असते. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

परिसरातील लाखो रुग्णांना लाभ...
जैताणे ग्रामीण रुग्णालयामुळे माळमाथा परिसरातील जैताणे, दुसाणे, छडवेल, नवापाडा आदी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे 72 खेड्यातील लाखो गोरगरिबांना याचा लाभ होणार आहे. अजूनही अपुऱ्या वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांना पुढील उपचारासाठी साक्री, धुळे, नंदुरबार याठिकाणी घेऊन जावे लागते. त्यामुळे अनेकदा रस्त्यातच रुग्ण दगावल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.

३० खाटा व २५ कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा मंजूर...
ग्रामीण रुग्णालयासाठी किमान ३० खाटा व २५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा मंजूर असून त्यात वैद्यकीय अधिक्षकांसह तज्ञ शल्यचिकित्सक, भुलतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी किमान चार तज्ञ डॉक्टरांसह नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. एक्स-रे, रक्त, लघवी, थुंकी तपासणी आदी सुविधा उपलब्ध होतील. कुपोषित बालकांवर उपचार, कुटुंबनियोजन, नसबंदी शस्त्रक्रिया, सिझेरियन, एचआयव्ही टेस्ट, विषबाधा व सर्पदंश, अपघात, क्षयरोग आदींबाबत सुविधा व उपाययोजना उपलब्ध होतील. रुग्णकल्याण समितीमार्फत रुग्णालयात जमा होणारा निधीही रुग्णांच्या कल्याणासाठी तिथेच खर्ची टाकता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaitane Rural Hospital requires no objection certificate