
भुसावळ : मुंबईहून जळगावला येणारे विमान अहमदाबाद (गुजरात) येथील विमानतळावर पोचल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. मात्र, खासदार रक्षा खडसे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याने या प्रवाशांच्या राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकली, तर काही प्रवाशांना औरंगाबादच्या विमानातून पाठविण्यात आले.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज दुपारी पावणेपाचच्या सुमारास ट्रुजेट कंपनीच्या विमानाने (२टी७१६) जळगावला जाण्यासाठी उड्डाण केले. अर्ध्या तासानंतर विमान आकाशात असताना पायलटने उद्घोषणा केली, की ढगाळ वातावरणामुळे विमान जळगावला न जाता अहमदाबादला उतरवण्यात येईल. विमान अहमदाबादला उतरल्यानंतर ट्रुजेट कंपनीच्या आस्थापनाने सर्व प्रवाशांना वाऱ्यावर सोडले. आपापली व्यवस्था आपण करा, असे सांगितले. हे ऐकून लहान मुले व सोबत असलेल्या महिलांना रडू कोसळले. भुसावळचे सराफी व्यावसायिक उज्ज्वल सराफ या विमानातून प्रवास करीत होते. त्यांनी खासदार रक्षा खडसे यांचे नाव सांगितले, तेव्हा ते लोक नरमले आणि मग सहकार्याची भाषा करू लागले. मात्र, प्रवाशांना जेवण किंवा रूम उपलब्ध करून दिल्या नाहीत. लहान मुले, वृद्ध आणि विदेशातून प्रवास करून आलेल्या एकट्या स्त्रिया या सर्वांनाच या प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप होत होता. हे पाहून सराफ यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा भुसावळचे नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली व तेथील व्हिडिओ शेअर केला. नेवे यांनी खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील यांना ही माहिती दिली. दोघेही अधिवेशन सुरू असल्याने दिल्लीत होते. त्यांनी यातून मार्ग काढू, असे सांगितले. खडसे यांनी ‘ट्रुजेट’चे व्यवस्थापक अखिलेश यांच्याशी चर्चा केली. प्रवाशांची सोय न झाल्यास संसदेत हा प्रश्न मांडेल, अशी तंबी दिली. अखेर तीस प्रवाशांना मुक्कामासाठी रूम उपलब्ध करून देण्यात आल्या, तसेच सर्वांच्या जेवणाचीही व्यवस्था संबंधित विमान कंपनीने केली. उद्या (ता. २२) सकाळी अकराला हे प्रवासी विमानाने जळगावकडे रवाना होतील. उर्वरित प्रवाशांनी औरंगाबादला जाण्याचे मान्य केल्याने त्यांना तेथे जाणाऱ्या विमानात बसवून रवाना करण्यात आले. जळगावला येणारे विमान अहमदाबादला जाण्याची ही या महिन्यातील दुसरी घटना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.