Municipal Elections
sakal
जळगाव: भारतीय जनता पक्षाने जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन आमदारांकडे धुरा सोपवली आहे. निवडणूक प्रभारी म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र जारी होताच स्थानिक आमदार सुरेश (राजूमामा) भोळे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. या नाराजीच्या सुराचा धूर लागलीच प्रदेश पातळीपर्यंत पोहोचून त्यानंतरच्या दोन- तीन तासांतच निवडणुकीसाठी भोळेंना प्रमुख करण्यासंबंधी पत्र जारी झाले.
महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जबाबदारी, नेतृत्व देण्याच्या या राजकारणात चव्हाण, भोळेंकडे संयुक्तपणे निवडणुकीची धुरा सोपवून पक्षश्रेष्ठींनी अंतिम अधिकार मंत्री गिरीश महाजनांकडेच राहतील, असा संदेश देण्याची काळजी घेतल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
भाजपत नाराजीमागून नाराजी
महापालिका निवडणुकीचे पडघाम आता जोरात वाजू लागले आहेत. भाजपमध्ये गेल्या महिन्यातच अन्य पक्षांमधून झालेल्या ‘इनकमिंग’मुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्या नाराजीचा दुसरा अंक दोन दिवसांपूर्वी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेताना समोर आला. मुलाखती घेण्यासाठी पक्षातील संघटनात्मक प्रमुखांसह मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. त्याचवेळी नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या नितीन लढ्ढांनीही मुलाखती घेतल्याने भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. काही जण तर मुलाखत न देताच निघून गेल्याचीही चर्चा आहे.
नाराजीचा तिसरा अंक
नाराजीचा दुसरा अंक दूर होत नाही तोच, मनपा निवडणूक प्रभारी म्हणून पक्षाने मंगेश चव्हाणांची नियुक्ती केली. त्यासंबंधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे पत्र गुरुवारी (ता.१८) प्रसिद्ध झाले आणि पुन्हा भोळे समर्थकांमध्ये नाराजीच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. गुरुवारी सायंकाळपर्यंत या नाराजीची चर्चा खूपच पसरली. त्यामुळे रवींद्र चव्हाणांना रात्रीपर्यंत या निवडणुकीचे प्रमुख म्हणून भोळेंच्या नियुक्तीचे पत्र प्रसिद्धीस द्यावे लागले.
अंतिम शब्द मंत्री महाजनांचाच...
सुरेश भोळेंना निवडणूक प्रमुख केल्यावर आता भाजप कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण निर्णय नेमके कोण घेणार, अंतिम निर्णय कुणाचा? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. जळगाव शहराचे आमदार म्हणून भोळे यांना निवडणुकीचे सर्वाधिकार हवे होते. मात्र, मंगेश चव्हाणांना पक्षाने ‘प्रभारी’ नेमत भोळेंना शह दिल्याची चर्चा आहे; तर चव्हाण व भोळेंना वेगवेगळी पदे देऊन अंतिम शब्द मंत्री गिरीश महाजनांचाच चालेल, अशी व्यवस्था पक्षाने केल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.