गाळेधारकांनी भरली 48 कोटींची थकबाकी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या तीन व्यापारी संकुलांतील गाळेधारकांकडून थकबाकी भरण्यासाठी ओघ सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 48 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली असून, जुने बी. जे. मार्केटमधील गाळेधारकांना उद्या (ता.26) थकबाकी भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, आज 50 गाळेधारकांनी 1 कोटी 25 लाख रुपयांचे धनादेश दिले. 

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या तीन व्यापारी संकुलांतील गाळेधारकांकडून थकबाकी भरण्यासाठी ओघ सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 48 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली असून, जुने बी. जे. मार्केटमधील गाळेधारकांना उद्या (ता.26) थकबाकी भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, आज 50 गाळेधारकांनी 1 कोटी 25 लाख रुपयांचे धनादेश दिले. 

महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 संकुलातील गाळेधारकांच्या गाळे कराराची मुदत 2012 ला मुदत संपली होती. गेल्या आठ वर्षांपासून थकबाकी न भरल्याने महापालिका प्रशासनाने वसुली मोहीम हाती घेतली असून, फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील 976 गाळेधारकांना 81 "क' नुसार नुकसान भरपाईची नोटीस दिली होती. त्यानंतर गाळेधारकांचा थकबाकी भरण्याचा ओघ सुरू होता. दोन्ही व्यापारी संकुलातील सुमारे चारशे गाळेधारकांनी पूर्ण थकबाकी भरली असून, त्यांना "नो ड्यूज' प्रमाणपत्र देण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. 

आज अंतिम मुदत 
जुने बी. जे. मार्केटमधील 284 गाळेधारकांना 81 "क'नुसार नोटीस दिली आहे. नोटिशीनुसार उद्या (ता.26) थकबाकी भरण्याची अंतिम मुदत आहे. आतापर्यंत 88 गाळेधारकांनी महापालिका 3 कोटी रुपयांचे धनादेश दिले आहेत. 

आंदोलन स्थगित 
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरू असल्याने आंदोलन करून कोणाला मागणी करायची, याचा पेच आहे. त्यामुळे महापालिका मार्केट असोसिएशनतर्फे उद्या (ता.26) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तसेच जेलभरो आंदोलनाला देखील स्थगिती दिली असल्याची माहिती कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली. 

...अन्यथा कारवाई 
जुने बी. जे. मार्केटमधील काही गाळेधारकांनी थकबाकी भरण्यासाठी अनुकूलता दर्शविली असून, उद्या (ता. 26) शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पैसे भरण्याची शक्‍यता आहे. परंतु जे गाळेधारक थकबाकीची रक्कम भरणार नाही, अशा गाळेधारकांची दुकाने सील करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली आहे. 

गाळेधारकांचा प्रतिसाद 
महापालिकेच्या 18 मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांपैकी फुले, सेंट्रल फुले व जुने बी. जे. मार्केटमधील अनेक गाळेधारकांनी पैसे भरले आहेत. त्यापोटी महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत 48 कोटी रुपये जमा झाले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon fule market wyapari 48 carrore oending bill