esakal | नागरिकत्व'विरोधात जळगावात प्रचंड मोर्चा 
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकत्व'विरोधात जळगावात प्रचंड मोर्चा 

नागरिकत्व'विरोधात जळगावात प्रचंड मोर्चा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः "अरे हम लेके रहेंगे आझादी...बापूवाली आझादी', डॉ. बाबासाहेब वाली आझादी...'अशा घोषणांनी जळगाव शहर दणाणले. संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे "नागरिकत्व' कायद्याविरोधात काढलेल्या निषेध मोर्चा व जाहीर सभा झाली. यात जिल्ह्यातील 55 विविध संघटनांनी सहभाग घेतला. दरम्यान, 17 जानेवारीला प्रत्येक गावांत आंदोलन करण्याचा इशारा सभेत देण्यात आला. 

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) या कायद्यांच्या विरोधात आज विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खानदेश सेंट्रल मॉलपासून मोर्चास सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे कटआऊट मोर्चाच्या अग्रभागी वाहनावर ठेवण्यात आले होते. असंख्य मुस्लिम, हिंदू महिला, नागरिक, युवक विविध परिसरातून मोर्चात युवक सहभागी झाले होते. ते रिक्षामध्ये लाउडस्पीकर लावून घोषणा देत होते. 
"मौलाना आझाद'चे करीम सालार, "राष्ट्रवादी'चे अब्दुल गफ्फार मलिक, "जमियात उलमा'चे मुफ्ती हारून, संविधान, बचाव समिती भुसावळचे ऍड. एहतेशाम मलिक, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कल्पिता पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे ईश्वर मोरे, संविधान जागर समितीचे प्रा. प्रीतीलाल पवार, नियाज अली फाउंडेशनचे अयाज अली, "जमात-ए-इस्लामी'चे आमीर सोहेल, एसआयओ महिला विंगच्या नीलोफर इक्‍बाल, अमोल कोल्हे, शिवराम पाटील, नगरसेवक इब्राहिम पटेल, आवाज फाउंडेशनचे जमील देशपांडे, "रेडक्रॉस'चे गनी मेमन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, खलिल देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
सभेत एकूण सहा ठराव पारित करण्यात आले. प्रास्ताविक मुकुंद सपकाळे यांनी केले. आभार फारुक शेख यांनी मानले. 

सभेतील मान्यवरांची भाषणे 

जातीवर राजकारण होतेय 
करीम सालार ः देशात जातींवर राजकारण केले जाते आहे. देशाला सक्षम करा, देशात असंख्य बेरोजगार आहेत. आधी रोजगार द्या, नंतर पुरावे मागा. 

"सीएए' लागू करू नये 
ईश्‍वर मोरे ः "सीएए' लागू करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, ती सोडविली पाहिजे. केंद्राने "सीएए' लागू करायला नको. 

आम्हाला देशभक्ती शिकवू नये 
प्रतिभा शिंदे ः जे पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाऊन येतात, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. "अच्छेदिन'चे स्वप्न दाखवून आम्हाला नोटाबंदी, पुलवामा, ट्रिपल तलाक, बेरोजगारी दिली. आता "सीएए' लागू करण्याची भाषा केली जाते. मोदी महिलाविरोधी, मुस्लिम विरोधी, आदिवासीविरोधी आहेत. या देशात "सीएए' लागू करू दिला जाणार नाही. 

"चोरो'से लडेंगे 
मुक्ती हारून नदवी ः"हमारे दादा लडे थे "गोरो' से, हम लडेंगे 'चोरो'से. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, बलात्कार आदी समस्या आहेत. केंद्र शासनाने ते सोडविण्याऐवजी "सीएए' लागू करून देशात राहणाऱ्यांनाच पुरावे लागणे हिटलरशाहीचे लक्षण आहे. 

पुरावे देणार नाही 
कल्पिता पाटील ः मोदी शासन संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंहला देशपातळीवरील समितीवर घेते अन सर्वसामान्यांना पुरावे मागते. आम्ही पुरावे देणार नाही. देशाला गुजरात होऊ देणार नाही. 

आदिवासींजवळ पुरावेच नाही 
गनी मेमन ः हिंदू, मुस्लिम बांधवांमध्ये दरी निर्माण करण्याचा "सीएए' हा प्रयत्न आहे. आमच्या पूर्वजांनी देशासाठी बलिदान दिले आहे. 25 कोटी आदिवासी बांधवांजवळ पुरावे नाहीत. त्यांना रोजगाराची चिंता आहे. हा निर्णय रद्द करावा. 

...तर ऐतिहासिक ठेवे द्यावे लागतील 
ऍड. जमिल देशपांडे ः आमच्या पूर्वजांनी ताजमहाल, लाल किल्ला बांधला. आमचे पुरावे शोधाल तर हे ऐतिहासिक ठेवे आम्हाला द्यावे लागतील, अन आमच्याकडे पुरावे मागता. सर्वधर्म समभावाचा हिंदुस्तान आहे. याला कदापी डिटेंशन सेंटर होऊ देणार नाही. 

आम्ही देशाचे मालक 
गफ्फार मलिक ः केंद्र शासन आम्हाला पुरावे मागू शकत नाही. आम्ही या देशाचे मालक आहोत. युवक जोशमध्ये येऊन रस्त्यावर उतरले आहे. त्यांना आता होश ही ठेवावा लागेल. आता लढाईला सुरवात झाली आहे.