महामार्गावर रोज अपघात; लोकप्रतिनिधी गप्पच! 

accidant
accidant

जळगावः राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज अपघात होऊन त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच आहे. अनेकांना अपघातात प्राण गमवावा लागतो इतका हा महामार्ग खड्डेमय बनलेला आहे. शनिवारी (18 जानेवारी) बांभोरीनजीक गिरणा नदीपुलाजवळ महामार्गावर कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने सिंधी दाम्पत्य जागीच ठार झाले. या महामार्गाच्या कामाविषयी लोकप्रतिनिधी, नियोजन समितीचे सदस्य सभेत गोंधळ घालून महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतील, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. मात्र लोकप्रतिनिधींनी या विषयावर एक शब्दही न काढता चूप राहणे पसंत केले. यामागचे गमक काय? अशी चर्चा आता जनतेत रंगू लागली आहे. 
शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक वाढल्याने या मार्गाला समांतर रस्ते करावेत, महामार्गाचे चौपदीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. यंदा शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले असले, तरी जळगाव ते फागणेदरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण अजूनही रखडलेले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. आतापर्यंत तीनशेवर नागरिकांचा या महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला, मात्र तरीही महामार्गाचे काम लवकर होत नाही. किंबहुना खड्डेही तत्काळ बुजविले जात नाही. याकडे ना अधिकारी लक्ष देत आहेत ना जिल्हाधिकारी. नियोनज मंडळाच्या बैठकीत तरी लोकप्रतिनिधी या ज्वलंत प्रश्‍नावर आवाज उठवून महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे, कामाला गती देण्यावर चर्चा होऊन आदेश काढतील. अपघाताला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची भूमिका घेतील, असे अपेक्षित होते. मात्र, तसे बैठकीत न झाल्याने नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

तीस वर्षांनंतर खडसे सभागृहात नाही 
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा आदरयुक्त प्रभाव असायचा. ही अशी पहिली बैठक ठरली, की ज्यात तीस वर्षांनंतर जिल्ह्यातील प्रश्‍नांची बारकाईने जाण असलेले, अभ्यासू, लोकांच्या प्रश्‍नांवर अभ्यासपूर्ण विवेचन करून प्रश्‍न सोडवून घेणारे श्री. खडसे सभेत नव्हते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांच्याकडे सभागृहाचे सदस्यपद नसल्याने श्री. खडसे सभागृहात नव्हते. 


केंद्राकडे पाठपुरावा सुरूच! 
खासदार उन्मेष पाटील ः राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या चौपदरीकरणाबाबत माझा केंद्रस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद सुरू आहे. जळगाव ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी सुरू असले तरी त्यात गती यावी, यासाठी प्रयत्न करीत आहे. नियोजन मंडळाच्या बैठकीत एवढे विषय होते, की हा विषय काढायला वेळच मिळाला नाही. 

चाळीसगाव महामार्गाचे सुरू 
आमदार मंगेश चव्हाण ः महामार्गावरील अपघात हा चिंतेचा विषय आहे. जळगाव ते फागणेपर्यंतचा महामार्ग खराब झालेला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी मी अधिकाऱ्यांकडे केली. "जळगाव ते चाळीसगाव' महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा करून ते काम मार्गी लागले आहे. 

अधिकाऱ्यांना पत्र देणार 
आमदार सुरेश भोळे ः जळगावमधून जाणारा महामार्ग क्र. 6 धोकादायक बनला आहे, हे खरे आहे. नागरिकांनी वाहन चालविताना "हेल्मेट'चा वापर केल्यास दुर्दैवी घटना घडणार नाहीत. शहरातील महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी सिन्हा यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. पुन्हा एकदा त्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन महामार्गाचे काम लवकर करावे, तसेच खड्डे बुजवावेत, अशी मागणी करू. 

पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करू 
आमदार किशोर पाटील ः जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत विविध प्रश्‍न मांडले. महामार्गाच्या कामांचा, त्यावरील खड्ड्यांचा विषय मी मांडणार होतो. मात्र, पालकमंत्र्यांना बाहेरगावी जावे लागल्याने त्यांनी सभा आटोपती घेतली. महामार्गाच्या कामांचा विषय पालकमंत्र्यांकडे मांडून तो मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com