सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार कायम 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या दरातील चढउतार अजूनही सुरूच आहे. सुवर्णबाजारपेठेत आलेली अस्थिरता कधी मिटणार, याबाबत देखील अनिश्‍चितता असल्याचे बोलले जात असून, सोन्याचे दर 600 रुपये तर चांदीचे दर हजार रुपयांनी वधारले आहेत. 

जळगाव ः अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला नाही. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असून, सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या दरातील चढउतार अजूनही सुरूच आहे. सुवर्णबाजारपेठेत आलेली अस्थिरता कधी मिटणार, याबाबत देखील अनिश्‍चितता असल्याचे बोलले जात असून, सोन्याचे दर 600 रुपये तर चांदीचे दर हजार रुपयांनी वधारले आहेत. 

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून अमेरिका व इराण यांच्यात तणाव सुरू आहे. मध्यंतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीचा परिणाम जागतिक सोने बाजारावर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे डॉलरच्या किमतीत वाढ होणे हा सुवर्ण बाजारपेठेतील दरवाढीमागचे कारण बोलले जात आहे. सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 41 हजार 100 रुपयांपर्यंत पोचला आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 48 हजार रुपये आहे. 

सोने सहाशे रुपयांनी वधारले 
महिन्याच्या सुरवातीला सोन्याचे दर 39 हजार 500 रुपयांवर होते. यात आठवडाभरात वाढ होऊन दर 41 हजार 650 रुपयांवर पोहचले होते. सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे दहा ग्रॅमला सोन्याचे दर 45 हजारापर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, मागील दहा दिवसांपासून दर स्थिरावलेले होते. मात्र, तुलनेत सुवर्णबाजारात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तेजी येत सहाशे रुपयांनी वाढ झाली. यामुळे जळगावच्या सुवर्णबाजारात आज (ता. 28) सोने 41 हजार 100 इतके झाले आहे. यात आणखी वाढ किंवा घट होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याचे बोलले जात आहे. 

हेपण पहा ःमहाआघाडीत खिंडार पाडण्यात अखेर भाजप यशस्वी
 

चांदी हजार रुपयांनी महागली 
सोन्याच्या दरात चढउतार सुरू असताना 17 जानेवारीपासून चांदीचे दर 47 हजार रुपयांवर स्थिरावलेले होते. मात्र, काल आणि आज चांदीच्या मार्केटने उसळी घेतल्याने चांदीच्या दरात प्रति किलोमागे एक हजार रुपयांनी वाढ झाली. यामुळे चांदीचे दर 48 हजार रुपयांवर पोहचले आहेत. 

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सुवर्ण बाजारात होत आहे. यामुळे सोने- चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास दर वाढण्याची शक्‍यता आहे. 
- सुशील बाफना, संचालक, आर. सी. बाफना ज्वेलर्स 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Gold and silver prices fluctuate forever