महाआघाडीत खिंडार पाडण्यात अखेर भाजप यशस्वी

बळवंत बोरसे
Tuesday, 28 January 2020

जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा राज्यात नुकतेच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती, त्यामुळे त्या समीकरणांनुसारच जिल्हा परिषदेची निवडणूक होईल असे मानले जात होते. मात्र पहिल्या दिवसापासून कॉंग्रेस आणि शिवसेना आपापल्या भूमिकेवर ठाम होती.

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झालेली उलटी गिनती आज विषय समितींच्या निवडणुकीने आणखी तीव्र झाली. यापुढील राजकारण नक्की कोणते वळण घेऊ शकते याची झळक यानिमित्ताने दिसून आली आहे. कॉंग्रेसने एकाच दगडात दोन पक्षी मारत सोयीचे राजकारण करीत भाजपला आश्‍चर्यकारक साथ दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता नसतानाही सभापतीपदाची लॉटरी भाजपला लागली आहे. दुसरीकडे सुरवातीपासून ताणणाऱ्या शिवसेनेची अवस्था तेल गेले, तूप गेले आणि हाती आले धुपाटणे अशी झाली आहे. 

नक्‍की पहा - मुख्यमंत्र्यांच्या खर्चास भाजप नगरसेवकांचा विरोध 

जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा राज्यात नुकतेच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती, त्यामुळे त्या समीकरणांनुसारच जिल्हा परिषदेची निवडणूक होईल असे मानले जात होते. मात्र पहिल्या दिवसापासून कॉंग्रेस आणि शिवसेना आपापल्या भूमिकेवर ठाम होती. कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या स्वतंत्ररित्या झालेल्या मेळाव्यातील दोन्ही नेत्यांची वक्तव्ये आठवली की आज जे घडले किंबहुना जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवडणुकीत जे घडले, त्याची बीजे त्यात रोवली गेलेली होती. तीन दशके राजकारण करणाऱ्या भूतपूर्व कॉंग्रेसचे आणि आत्ताचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना राजकारणातील या चालींचा कल्पना आलेली नसावी असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र राज्यात आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, सत्तेच्या चाव्या आपल्या हातात आहेत, त्यामुळे आपण पाहिजे तसे वाकवू शकतो हा त्यांचा आत्मविश्‍वास होता. त्यामुळे आधी अध्यक्षपद आणि नंतर उपाध्यक्षपद व दोन सभापतीपदे या मागणीवर ते ठाम राहिले,नव्हे ते गाफिलच राहिले असे आता म्हणता येईल. 

बेसावध राहिली शिवसेना 
इकडे २३ जागा मिळूनही सत्ता स्थापन करू न शकलेले भाजपचे चाणक्य, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचा भरपूर प्रयत्न केलाही, पण अध्यक्ष निवडणुकीत तसे काहीही होवू शकले नाही, किंबहुना कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही. आत्ताच भाजपला साथ दिली तर राज्यात वेगळा संदेश जाईल याचा विचार करून तेव्हा शिवसेनेला सात देत कॉंग्रेसने आघाडीचा धर्म पाळला, मात्र शिवसेना इथेच फसली. उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी घेतले गेलेले मतदान हीच पुढच्या खेळीची नांदी होती, हे त्यांना कळले नाही. अगदी आज सकाळपर्यत कॉंग्रेसने त्यांना अर्ज भरायला लावले तोपर्यत शिवसेना बेसावध राहिली. अन एनवेळी भाजपच्या उमेदवाराला मतदान करीत कॉंग्रेसने शिवसेनेला तोंडघशी पाडले. 

शिवसेनेने अति ताणले का..? 
जिल्हा परिषदेत आज जे घडले ते अचानक घडलेले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे बीज रोवले गेले होते. श्री. रघुवंशी आजारपणातून राजकारणात सक्रीय झाले तेव्हाच त्यांनी आता राज्यात काहीही घडो नंदुरबारमध्ये माझी आणि डॉ. विजयकुमार गावित यांची युती अभेद्य राहिल असे जाहीर करून तमाम नंदुरबारकरांना मोठा धक्का दिला होता. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 
विधानसभा निवडणुकीच्या आधी ते कॉंग्रेस सोडून शिवसेनेत गेले. तेथूनच त्यांनी राजकीय फासे टाकायला सुरवात केली. राजकारणात मुरब्बी असलेल्या चंदूभय्याची चाल तेव्हा कॉंग्रेसचे उमेदवार व विद्यमान मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्याविरोधात होती. शिवसेनेने तेथून दिलेल्या उमेदवाराला प्रथमच विजयी उमेदवाराच्या आसपास मते मिळाली. श्री. पाडवी यांचे मताधिक्क्यही घटले. आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राने आपल्याविरोधात घेतलेली ही भूमिका पाडवी यांना जिल्हारी लागल्याचे तेव्हा बोलले जात होते. श्री. पाडवी अल्पमताने विजयी झाले अन शिवसेनेला जागा मिळवून देण्याचे श्री. रघुवंशी यांचे स्वप्नही भंगले. 

पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले अन श्री. पाडवी यांना आदिवासी विकास खातेही मिळाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्याच होत्या. श्री. पाडवी यांनी आपल्या पत्नींना तोरणमाळ गटातून उमेदवारी करीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे स्वप्नही पाहिले, पण तेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले अन नुकतेच मंत्रीपद मिळालेल्या पाडवी यांना राज्याच्या राजकारणात मोठा धक्का बसला. हा पराभव श्री. पाडवी यांना जिव्हारी लागला. या पराभवासाठीही श्री. रघुवंशी यांनी पूर्णपणे ताकद लावल्याचे बोलले गेले. दरम्यान धडगाव पंचायत समितीचे उपसभापतीपद कॉंग्रेसने मागितले होते, मात्र ते शिवसेनेने दिले नाही. तेव्हापासून वाढलेला हा दुरावा शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या जाऊनही दोघांनाही न मिटविता आल्याने या संधीचा फायदा भाजपने घेतला नसता तर नवलच. इकडे उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळाले, तसे सभापतीपदही मिळेल असा विश्‍वास ठेवून असलेली शिवसेना मात्र गाफिल राहिली. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतर सभापतीपदांबाबत शिवसेनेने अखेरपर्यत घेतलेली तुटेपर्यत ताणल्याची भूमिका यामुळे शिवसेनचा गेम करीत तोंडघशी पाडण्यात आले. 

कॉंग्रेसने विश्‍वासघात केला : थोरात 
राज्यस्तरावर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या कॉंग्रेसने विश्‍वासघात करीत दगा दिला आहे. आम्ही याबाबतचा सविस्तर अहवाल आमचे नेते, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देऊ, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर काय ती भूमिका घेतली जाईल. सभापतीपदाबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांशी काल आमच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानुसार फक्त कोणते सभापतीपद एवढेच बाकी होते. त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही अर्जही भरले, मात्र एनवेळी कॉंग्रेसने विश्‍वासघातकी राजकारण केले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्क नेते बबनराव थोरात यांनी आजच्या घडामोडींनंतर व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar zilha parishad mahaaaghadi cross bjp one member win