पोलिसांची आरोग्य तपासणी होतेय खासगी रुग्णालयात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पोलिसांच्या आरोग्य तपासण्यांचा ठेका खासगी डॉक्‍टरांना देण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 200 रुपये अतिरिक्त आकारले जात असल्याची ओरड कर्मचाऱ्यांतर्फे होऊ लागली आहे. 

जळगाव : चांगली दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यात आले. शासकीय रुग्णालयाची विश्‍वासार्ह्यता म्हणून सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासण्या या ठिकाणी करण्यात येतात. मात्र, पोलिसांच्या आरोग्य तपासण्यांचा ठेका खासगी डॉक्‍टरांना देण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 200 रुपये अतिरिक्त आकारले जात असल्याची ओरड कर्मचाऱ्यांतर्फे होऊ लागली आहे. 

महाराष्ट्र पोलिस दलातर्फे निर्धारित करण्यात आलेल्या मानकानुसार पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याअंतर्गत कर्मचाऱ्याची उंची नुसार असलेले वजन, वयाच्या तुलनेत जडलेल्या विविध व्याधी आणि शरीर प्रकृती अशी सर्वांगीण आरोग्य तपासणीत पात्र ठरणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षाला 1 हजार 800 रुपये फिटनेस भत्ता दिला जातो. दरवर्षी कर्मचाऱ्यांनी निर्धारित केलेल्या डॉक्‍टरांकडून तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र जोडल्यावर भत्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग होते. पोलिसदलातर्फे शासकीय रुग्णालय वगळता शहरात दोन खासगी दवाखान्यांना ही मान्यता दिली असून, त्यापैकी आकाशवाणी चौकातील दवाखान्यात तपासणी प्रमाणपत्राचे कर्मचाऱ्यांकडून पैसे आकारले जात नाही, तर शाहूनगरातील खासगी रुग्णालयात मात्र हातात प्रमाणपत्र देण्यापूर्वीच फिट असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 200 रुपये आकारण्यात येतात, अशा तक्रारी आहेत. 

नक्की पहा ः टि-शर्ट वरील वाचला मजकूर...अन्‌ सापडला डॉक्‍टर "मुन्नाभाई' 
 

सरकारी रुग्णालयात तपासणी नाहीच 
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येच्या उपचारासाठी सक्षम असताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी खासगी रुग्णालयांचा हट्ट का, असाही प्रश्‍न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news jalgaon Police private hospital heith chekup