esakal | दहावी-बारावीची परीक्षा देणार लाखावर विद्यार्थी ! 

बोलून बातमी शोधा

exam

18 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे, तर तीन मार्चपासून दहावीची परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांना यंदा जिल्ह्यातून एक लाख 13 हजार 473 विद्यार्थी बसणार आहेत. 

दहावी-बारावीची परीक्षा देणार लाखावर विद्यार्थी ! 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 18 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे, तर तीन मार्चपासून दहावीची परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांना यंदा जिल्ह्यातून एक लाख 13 हजार 473 विद्यार्थी बसणार आहेत. 


जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून दोन्ही परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले आहे. परीक्षेच्या काळात कॉपी रोखण्यासाठी सात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेला 49 हजार 403, तर दहावीच्या परीक्षेला 64 हजार 70 विद्यार्थी बसणार आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातर्फे बारावीच्या परीक्षेसाठी 71, तर दहावीसाठी 134 परीक्षा केंद्रे आहेत. 

नक्की पहा : धक्कादायक...आईची पाठ फिरताच बालिका दारातून बेपत्ता !
 

सात भरारी पथके 
दहावी- बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा कायम असतो. तरीदेखील कॉपीमुक्‍त परीक्षा अद्याप झालेली नाही. कॉपी रोखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सात भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके जिल्हाभरातील सर्व केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने पाहाणी करणार आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य (डाएट), ज्येष्ठ अधिव्याख्याता (डाएट) तसेच महिला भरारी पथकाचा समावेश आहे. 

हेपण पहा : जळगावच्या लिटल पॅडमॅनचे हे सयंत्र महिला आरोग्यासाठी वरदान 
 

उपद्रवी केंद्रांवर नजर 
परीक्षेच्या काळात व्हॉट्‌सऍपवर प्रश्नपत्रिका व्हायरल होणे, कॉपी पुरविण्याचे प्रकार सर्रासपणे होत असतात. असे प्रकार जास्त होणाऱ्या उपद्रवी केद्रांवर शिक्षण विभागाच्या भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. जिल्ह्यात अशी 39 उपद्रवी केंद्रे असून, तेथे बैठे पथक संपूर्ण पेपराच्या वेळेत असणार आहे. एकाच वर्गात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.