दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार 

दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार 

जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी समस्यांबाबत चालढकल करतात. भारताची वाटचाल महासत्तेकडे होत असताना शहराची वाटचाल मात्र ग्रामपंचायतीच्या कारभारापेक्षा वाईट झाली आहे. शहराचा विकास होण्यासाठी राजकारण विरहित दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. तो येत्या महिन्याभरात आम्ही तयार करू, असा सूर आज "सकाळ- संवाद' कार्यक्रमात रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 
"सकाळ'च्या शहर कार्यालयात आज "सकाळ संवाद' कार्यक्रम झाला. "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी या चर्चेमागची भूमिका विशद केली. 
------ 
इच्छाशक्तीचा अभाव 
डॉ. सुशीलकुमार राणे (अध्यक्ष, रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्ट) ः शहरात अनेक समस्या आहेत. शहराचा विकास खुंटला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत एकाच पक्षाची सत्ता असल्यावर शहर समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांची विकास करण्याची इच्छाशक्ती नाही. 
------- 
आर्थिक नियोजन हवे 
सुनील सुखवाणी (सचिव) : शहराची अवस्था गेल्या काही वर्षांत बिकट बनली आहे. महापालिका "हुडको'सह विविध कर्जाच्या खाईत आहे. नागरिकांना कर भरूनही सुविधा मिळत नाही. यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकही तितकेच जबाबदार आहेत. शहर विकासासाठी आर्थिक नियोजन होणे गरजेचे आहे. चांगली कामे व्हावी, यासाठी कंत्राटदारांवर प्रशासनाचा वचक हवा. यासाठी दबावगटासाठी रोटरी वेस्टने पुढाकार घेतला आहे. 
--------------- 

वेळेची मर्यादा हवी 
रमण जाजू (माजी अध्यक्ष) ः शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आहे. महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी लक्ष देत नाही. रस्त्यावरील धुळीने डोळे खराब झाल्याच्या घटना घडताहेत. आमच्या परिसरात आम्हीच रस्त्याची कामे करून घेतली आहेत. शहराची बिकट अवस्था हे महापालिकेतील नियोजनाचा अभावाचे उदाहरण आहे. विकास कामांसाठी वेळेची मर्यादा ठरवून दिली पाहिजे. 
------- 

सर्वसामान्यांनी पुढे यावे 
कृष्णकुमार वाणी (माजी सचिव रोटरी) ः महापालिकेत अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होतात. जो अधिकारी चांगले काम करायला निघतो. त्याची बदली होते. यामुळे अधिकाऱ्यांची कामे करण्याची मानसिकता राहत नाही. शहरातील समस्यांविरोधात रोटरी क्‍लबनेच आवाज उठविला आहे. तो सर्वसामान्यांनीही उठविला तर समस्या सुटण्यास महापालिका पुढे येईल. 
------- 
विकासकामांची अपेक्षा 
विनोद बियाणी (माजी अध्यक्ष) ः वीस पंचवीस वर्षांपूर्वी नगरपालिका असताना शहराचा विकास चांगला होता. जळगावचा विकास पाहण्यासाठी इंदूरसह राज्यातील इतर ठिकाणावरून अनेक पथके येत असत. आता मात्र शहर समस्यांनी भकास झाले आहे. एमआयडीसीतील उद्योजकांना टॅक्‍स भरूनही महापालिका सुविधा देत नाही. राज्यात व महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असताना कामे होण्याची अपेक्षा नागरिक करीत आहेत. 
----- 

चांगल्या दर्जाची कामे हवी 
ऍड. सूरज जहांगीर-चौधरी (माजी अध्यक्ष) ः शहराला भविष्य नाही. समस्या का उद्‌भवतात. एकदा केलेले काम किमान पंचवीस वर्षे टिकले पाहिजे, अशी चांगल्या दर्जाची कामे झाली पाहिजे. किमान पंधरा वर्षे काम टिकली पाहिजेत, अन्यथा कंत्राटदाराला जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्याची तरतूद कंत्राट देताना होणे गरजेचे आहे. 
------- 
मनुष्यबळाचा योग्य वापर हवा 
गनी मेमन (माजी प्रांतपाल) ः शहरात 850 कोटीची कामे केल्याचा दावा केला जातो. वास्तविकता 350 कोटींची कामे झाली आहेत. राजकीय पदाधिकारी व अधिकारी समस्यांवर उपाय करण्याऐवजी वेळ मारून नेण्यावर भर देतात. गाळेधारकांकडून 450 वसूल होऊन महापालिकेचे उत्पन्न वाढेल, यासाठी आम्ही गाळेधारक व आयुक्तांची चर्चा घडवून आणत आहोत. महापालिकेत चाळीस टक्के जागा रिक्त आहेत. महापालिकेचे साठ टक्के उत्पन्न वेतनावर खर्च होते. अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा योग्य वापर होत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news rotry