उज्ज्वल स्प्राउटर स्कूलचे "कियारा' ठरले प्रथम! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

बारा नाटकांमधून उज्ज्वल स्प्राउंटर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "कियारा' या नाटकाने बाजी मारली. तर नानासाहेब आर. डी. पाटील विद्यालयाच्या "पोपट आणि आम्ही' या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावला.

जळगाव ः आंतरशालेय नाट्य स्पर्धेत अभिनयाची चुणूक दाखवत विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. दिवसभरात सादर झालेल्या बारा नाटकांमधून उज्ज्वल स्प्राउंटर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "कियारा' या नाटकाने बाजी मारली. तर नानासाहेब आर. डी. पाटील विद्यालयाच्या "पोपट आणि आम्ही' या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावला.
 
"सकाळ- एनआयई'तर्फे  सोमवारी आंतरशालेय नाट्यस्पर्धा रंगल्या. स्पर्धेत बारा शाळांमधील विद्यार्थ्यांनी रंगीत तालीम करत आज प्रत्यक्ष सादरीकरण केले. मायादेवीनगरातील रोटरी भवन येथे दिवसभर झालेल्या नाटकांच्या सादरीकरणानंतर सायंकाळी बक्षीस वितरण झाले. यावेळी विजेत्यांसह उत्कृष्ट सादरीकरणाच्या पारितोषिकासह सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रंगगंध कलासक्त न्यासचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर, संचालक डॉ. मीनाक्षी करंबेळकर, परीक्षक डॉ. किरण लद्दे, कलादर्शचे सचिन चौगुले उपस्थित होते. प्रगती माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. "एनआयई'च्या समन्वयिका हर्षदा नाईक यांनी आभार मानले. 

नाटकातून विरंगुळा व बौद्धिक विकास ः जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 
मराठी नाटकाला मोठी परंपरा आणि वारसा आहे. ही परंपरा जपायला हवी. जळगावला देखील नाटक येत नव्हती; यासाठी जास्त नाटकांचे सादरीकरण व्हावे आणि वारसा पुढे चालावा, यासाठी नाट्यगृह संस्थेला चालविण्यास देऊन दर कमी केले. यामुळे नाटक देखील आता येऊ लागले आहेत. नाटक पाहण्यातून विरंगुळा होण्यासोबत बौद्धिक विकास देखील होत असतो. इतकेच नाही तर चांगले कलावंत निर्माण होण्यास देखील मदत होत असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

परीक्षक म्हणतात.... 
चांगला प्लॅटफॉर्म 

डॉ. किरण लद्दे ः लहान मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म "सकाळ- एनआयई'च्या माध्यमातून उपलब्ध झाला. मुलांना या वयात असे व्यासपीठ मिळाल्यास पुढे जाऊन महाविद्यालयीन स्तरावर आणि नंतर नाट्यक्षेत्रात आपली छाप सोडू शकतात. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चांगला अनुभव देणारे आणि शिकायला लावणारे एक व्यासपीठ मिळाले. शालेय स्तरावर अशा प्रकारच्या स्पर्धा होणे गरजेचे आहे. तेच काम सकाळ- एनआयईच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

 
"सकाळ'चा उपक्रम स्तुत्य 
सुदीप्ता सरकार ः आंतरशालेय नाट्य स्पर्धा होणे विद्यार्थ्यांसाठी निश्‍चितच चांगले आहे. कारण मुलांना येथूनच शिकायला मिळते. नाटक सादरीकरण करताना काय चुका होतात, ते कळते आणि त्यात सुधारणा करता येते. त्या चुका पुढे जाऊन करणे मुलांना टाळता येतात. असे एक व्यासपीठ "सकाळ- एनआयई'च्या माध्यमातून मिळणे स्तुत्य आहे. 

स्पर्धेचा निकाल 

सांघिक नाटक 
प्रथम- कियारा (उज्ज्वल स्प्राउटर स्कूल) 
द्वितीय- पोपट आणि आम्ही (नानासाहेब आर. डी. पाटील स्कूल) 
तृतीय- म्याव..म्याव निरंजन (अनुभूती इंग्लिश स्कूल) 
उत्तेजनार्थ प्रथम- आई मला छोटीशी बंदूक दे ना (का. उ. कोल्हे विद्यालय) 
उत्तेजनार्थ प्रथम- फ्रूटप्रिंटस्‌ एक प्रवास (शानभाग विद्यालय). 

वैयक्‍तिक बक्षिसे 
दिग्दर्शन प्रथम- मानसी भदाणे (कियारा) 
लेखक प्रथम- वैभव मावळे (आई मला छोटीशी बंदुक दे ना) 
अभिनय मुलगा- पवन खोंडे (म्याव म्याव निरंजन) 
अभिनय मुलगी- राजेश्‍वरी सुन्ने (आम्हीच टिळक) 
नेपथ्य- गौरव नेरकर (पोपट आणि अम्ही) 
 

आर्वजून पहा : जळगाव तहसीलचे रेकॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news saka nie Inter-school theatrical competition fist priz kiyara