दातांमधील कंपणांद्वारे कर्णबधिरांना येईल ऐकू

धनश्री बागूल
सोमवार, 26 मार्च 2018

जळगाव - नवतंत्रज्ञानाच्या आहारी जाणारा आजचा तरुणवर्ग ज्येष्ठांच्या टीकेचा धनी बनला असला तरी या तंत्रज्ञानाचा विधायक वापर करत नवसंकल्पना साकारणाऱ्या तरुणांची संख्याही कमी नाही. अशाच एका तरुणानं कर्णबधिरांना सहज ऐकता येईल, असं एक अनोखे यंत्र तयार केलंय. "हिअरिंग बाय टीथ' असे या यंत्राला नाव दिले असून कर्णबधिर व्यक्तीच्या दातांना लावून त्यावरील कंपणाद्वारे तो ऐकू शकेल, असं तंत्रज्ञान यात विकसित करण्यात आलंय.

होळ (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी असलेल्या शुभम संजीव पाटील हा विद्यार्थी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भौतिकशास्त्र विद्याशाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याने जन्मत: कर्णबधिर असलेल्या व कमी ऐकू येणाऱ्या लहान मुलांपासून तर वयोवृध्दांसाठी "हिअरिंग बाय टीथ' या यंत्राची निर्मिती केली आहे. हे यंत्र समोरच्या व्यक्तीच्या दातांवर लावण्यात येते. तोंडाचा व कानांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे कर्णबधिर व्यक्तीने दातांवर यंत्र लावल्यानंतर जेव्हा समोरची व्यक्‍ती तिच्याशी बोलते तेव्हा त्या मशिनच्या कंपण यंत्राद्वारे समोरच्या व्यक्‍तीला अगदी स्पष्ट ऐकू येते. शुभमने आतापर्यंत अनेक व्यक्तींवर हा प्रयोग करून बघितला असून तो यशस्वी झाला आहे.

अशी सुचली कल्पना
शुभम हा एका लग्नात गेला असता त्याठिकाणी मोठ्या आवाजात डी.जे. सुरू होता. त्याठिकाणी डी.जे.च्या आवाजाने कंपनं जाणवायला सुरवात झाली व त्यामुळे कानाच्या पडद्यांना त्रास झाला. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, या तीव्र कंपनांचा कानाच्या पडद्यांशी संबंध आहे तेव्हापासून त्याने तब्बल तीन वर्षे सलग संशोधन करत हे मॉडेल साकारले. या यंत्राला चार्जिंग करण्याचीही सुविधा आहे.

राज्यातील पहिलाच प्रयोग
शुभम पाटील या विद्यार्थ्याने कर्णबधिर मुलांसाठी तयार केलेला प्रयोग हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. आतापर्यंत अनेक प्रयोग झाले मात्र सर्वांनी कर्णयंत्राची निर्मिती केली. परंतु कर्णयंत्र हे महागडे यंत्र असल्याने सामान्यांना ते परवडणार नाही. त्या तुलनेत हे यंत्र कमी खर्चिक असेल. अद्याप ते मार्केटमध्ये उपलब्ध नसले तरी लवकरच त्याचे पेटंट निश्‍चित करुन ते उपलब्ध करुन देण्याचा शुभमचा मानस आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये
- कमीत कमी खर्चात होते तयार
- लहानांपासून वृद्धापर्यंत उपयोगी
- स्पीच थेरपीपेक्षा अधिक उपयुक्त
- दात नसलेल्यांनादेखील उपयोगी

Web Title: jalgaon news hearing by teath machine