आई...मला छोटीशी बंदूक दे ना ! हरिविठ्ठल नगरातील घरातून जिवंत काडतुसासह पिस्तूल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

आई..मला छोटीशी बंदूक दे..ना ! इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकात अनेकांनी वाचली असेल, मात्र हरिविठ्ठल नगरातील दोघा भावंडांच्या घरात एक खरेखुरे आणि एक नकली पिस्तूल पोलिसांना आढळून आले आहे. तेही, घरझडती घेण्यास नकार देणाऱ्या आईच्या डोळ्यादेखत पोलिसांनी स्वयंपाक घरातून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केल्यानंतर मुलांचा बचाव करणारी "आई' निरुत्तर झाली.

जळगाव, :- रामानंदनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून हरिविठ्ठल नगरातील संतोष ज्ञानेश्‍वर पाटील याच्या घरातून 15 हजार किमतीचे गावठी पिस्तूल व 4 हजार रुपयांचे जिवंत काडतूस असा 19 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन दोघा भावंडाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

हरिविठ्ठल नगरातील बाजारपट्टा परिसरात राहणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर पाटील व योगेश ज्ञानेश्वर पाटील या दोघा भावंडांकडे दोन पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना कारवाईच्या सूचना दिल्यावरून गुन्हेशाखा आणि रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने रात्रीच हरिविठ्ठल नगरात संतोष पाटील यांचे घर गाठले. घर झडती घेतल्यानंतर दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस मिळून आल्यानंतर सतीश डोलारे यांनी रीतसर पंचनामा करून जप्त करण्यात आल्या. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोघा भावंडांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस कारवाई पूर्वीच दोन्ही भावंडं पसार झाले होते, आज सकाळ पासून त्यांचा शोध सुरू होता. त्यापैकी एकाला संध्याकाळी रामानंदनगर पोलिसांनी अटक केली असून दुसरा फरारच असल्याने त्याचा शोध सुरू होता. 

स्वयंपाक घरात आढळले पिस्तूल 
पोलिस पथकाने संतोष पाटील याच्या घराची झडती घेतल्यानंतर कुठेच काही मिळून येत नसल्याने स्वयंपाक घरात झडती घेतल्या केल्यानंतर लोखंडी कपाळावरील खोक्‍यात गावठी पिस्तूल सोबत चार जिवंत काडतूस मिळून आले. परिसरात गुंडगिरी करण्यासाठी दोघे भावंडे या पिस्तुलाचा वापर करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

खऱ्यासोबत खेळण्याचे पिस्तूल 
संशयित तरुणांची आई स्मृती ज्ञानेश्‍वर पाटील यांनी घरझडती घेण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी न जुमानता झडती घेतल्यानंतर स्वयंपाक घरातून खरे पिस्तूल आणि चार काडतूस मिळून आल्यानंतर..त्यांना परवाना विचारल्यावर निरुत्तर झाल्या. मात्र, पोलिस पथकाला दोन पिस्तुलची माहिती होती त्यात एक पिस्तूल कमी मिळून आले असून खेळण्यातील प्लॅस्टिकचे एक पिस्तूलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news ; pistol