जळगावचे रोजेदार काका-पुतणे लढवताय मालेगावात खिंड!  कुटुंबीय "क्वारंटाइन' तरीही "खाकी'चे कर्तव्यच " ईबादत ' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

कुटुंबीयांपासून दूर राहून पोलिस खात्याच्या कर्तव्यासह "रमजान'च्या "रोजा'चे नेटाने पालन काका- पुतणे करीत आहेत. तब्बल 45 दिवस "लॉकडाउन', त्यातही सर्वाधिक बाधित परिसराची जबाबदारी निभावत असल्याने लोकांच्या अडीअडचणी सोडवत, वेळप्रसंगी मालेगावच्या मोसम पुलावर दगड-धोंड्यांचा सामना करीतच "कोरोना'चे यशस्वी युद्ध जिंकूनच जळगावात ईद साजरी करू, असा संकल्प या काका- पुतण्याने केला आहे. 

जळगाव : महाराष्ट्र "कोरोना'शी दोन हात करत असतानाच मालेगाव शहराने राज्याच्या चिंतेत भर घातली. मालेगावात सर्वाधिक संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने पोलिस दलाला शहराचा ताबा घ्यावा लागला. मालेगाव "कोरोना' युद्धात पोलिसांचा मोलाचा वाटा राहिला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि राखीव बलातील जवान, अशा तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर जळगावचे काका-पुतणे "रमजान'चे "रोजे' राखून "कोरोना' युद्धात यशस्वी लढा देत आहेत. 
-------- 
जळगाव जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या पोलिस कुटुंबातील निरीक्षक बशीर अहमद शेख सध्या मालेगाव येथे वाहतूक निरीक्षक असून, पुतणे शकील शेख हे पवारवाडी पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक आहेत. धुळे राज्य राखीव पोलिस दलातील नवखे कर्मचारी अमीन शेख या तिन्ही काका-पुतण्यांनी गेल्या 46 दिवसांपासून "कोरोना' युद्धात स्वत:ला झोकून दिले आहे. जळगाव पोलिस दलात वडील करीम सिराजोद्दीन यांनी आपल्या सेवाकाळात खात्यासाठी बजावलेल्या कर्तव्याच्या संस्काराचा धागा तिसऱ्या पिढीतही अत्यंत मजबूत असल्याचे हे प्रतीक आहे. निरीक्षक बशीर यांची मुलगी डॉ. फरीन शेख मुंबईच्या ज्युपिटर रुग्णालयात सेवा देत असून, निवासस्थान असलेल्या कळवा (ता. ठाणे) येथील वास्तव्यास असलेल्या इमारतीत एक पोलिस कर्मचारी "कोरोना पॉझिटिव्ह' आल्याने संपूर्ण इमारतीतील सदस्य "क्वारंटाइन' आहेत; तर धुळ्याच्या मोहाडी पोलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक मुस्तफा हे तिरंगा चौकात (ता. 21) बंदोबस्तावर आहेत, धुळ्यातील "कोरोना'ने मृत्यू झालेल्या एका राजकीय नेत्याच्या भावाचा रहिवास असलेल्या ठिकाणची जबाबदारी पूर्ण केली. 

काका-पुतण्याचा "खाकी'चा "रोजा'! 
मालेगाव शहरात "कोरोना' चक्रव्यूहाच्या मध्यभागी पवारवाडीत शकील शेख दररोज गुलाब पार्क, मेहवीनगर, दातारनगर, गोल्डननगरच्या गस्तीवर आहेत; तर वाहतूक निरीक्षक बशीर शेख यांच्यावर मोसम पूल, छावणी, कॅम्प, मालेगाव शहर आणि किल्ला परिसराची जबाबदारी आहे. दोन्ही काका- पुतण्यांचे महिन्याचे "रोजे' येतात. पहाटेच्या "सेहरी'नंतरच ड्यूटीला सुरवात होऊन "इफ्तार' आणि प्रार्थना कुटुंब असलेल्या पोलिस सहकाऱ्यंसोबत होते. तिसरे अमीन शेख हे राखीव पोलिस कर्मचारीही "रोजा'चे पालन करीत होते. मात्र, त्यांच्या तुकडीतच "कोरोना'चा शिरकाव झाल्याने त्यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना धुळ्यात पाठवून "क्वारंटाइन' करण्यात आले आहे. 

"कोरोना'वर मात हीच "ईद'! 
कुटुंबीयांपासून दूर राहून पोलिस खात्याच्या कर्तव्यासह "रमजान'च्या "रोजा'चे नेटाने पालन काका- पुतणे करीत आहेत. तब्बल 45 दिवस "लॉकडाउन', त्यातही सर्वाधिक बाधित परिसराची जबाबदारी निभावत असल्याने लोकांच्या अडीअडचणी सोडवत, वेळप्रसंगी मालेगावच्या मोसम पुलावर दगड-धोंड्यांचा सामना करीतच "कोरोना'चे यशस्वी युद्ध जिंकूनच जळगावात ईद साजरी करू, असा संकल्प या काका- पुतण्याने केला आहे. 
-----------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon police inspector uncle andnephew on duty in malegaon