esakal | मोफत निवारा असूनही सुविधांअभावी रहिवासी त्रस्त 
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत निवारा असूनही सुविधांअभावी रहिवासी त्रस्त 

मोफत निवारा असूनही सुविधांअभावी रहिवासी त्रस्त 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

मोफत निवारा असूनही सुविधांअभावी रहिवासी त्रस्त 


जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेतर्फे झोपडपट्टी विरहित शहर करण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना घरकुले देण्यासाठी 11 हजार 424 घरांचा समावेश असलेली घरकुल योजना आखण्यात आली होती. त्यानुसार पिंप्राळा-हुडको येथे जागेत घरकुल बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, उभारणी दरम्यान मक्तेदार, महापालिका वाद, घरकुल योजनेत झालेला गैरव्यवहार या गोंधळात या घरकुलांमध्ये सुविधा देण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे या घरकुलांमध्ये आज स्थिती अत्यंत वाईट असून, तेथे गटारी, रस्ते, स्वच्छता, पथदिवे नसल्याने तेथील नागरिक प्रतिकूल स्थितीत जीवन जगत असल्याचे चित्र पाहायला मिळते. 

ज्या घरकुल घोटाळ्याचा विषय त्यातील आरोपींना मोठी शिक्षा झाल्यानंतर राज्यभरात सध्या चर्चेचा ठरला आहे, त्या प्रकरणातील कोट्यवधींच्या रकमेवर उभारण्यात आलेल्या घरकुलांची सद्य:स्थिती काय आहे, याचा घेतलेला हा "सकाळ ग्राउंड रिपोर्ट'... 

अपूर्ण अवस्थेत घरकुले उभे 
पिंप्राळा-हुडकोमध्ये साडेचार हजार घरे बांधण्याच्या योजनेपैकी सुमारे दोन हजार घरांचे बांधकामे पूर्ण करण्यात आली. अनेकांना ही घरकुले तत्कालीन नगरपालिकेने वाटप केली होती. कालांतराने या योजनेचे काम रखडले. त्यामुळे एक हजार घरकुले अर्धवट तर केवळ ओटा बांधून तयार असलेल्या सुमारे दीड हजार घरकुलांचे 
कामे थांबले होते. आता तर दीड हजार घरकुलाचे बांधकाम अनेकांनी तोडून, लोखंडी साहित्य, विटा चोरून नेल्या. त्यामुळे जागेवर केवळ आता झाडे- झुडपे असून ओसाड अवस्थेत ती जागा पडलेली आहे. 

अपूर्ण घरकुलांची दुरुस्ती करून रहिवास 
अर्धवट अवस्थेत असलेल्या घरकुलांवर अनेक नागरिकांनी ताबा घेत तेथे रहिवास सुरू केला. त्यांनीच घरकुलांवर खर्च करीत घरकुलांची दुरुस्ती करून ती घरकुले आजच्या स्थितीत जागेवर असल्याचे दिसत आहे. तर अनेक ठिकाणी नागरिकांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. 

नागरी सुविधांचे तीनतेरा 
पिंप्राळा- हुडकोमध्ये तत्कालीन नगरपालिकेने शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न बघून पिंप्राळा शिवारात घरकुलांची उभारणी केली. मात्र, उभारणीदरम्यान मक्तेदार, महापालिका वाद, घरकुल योजनेत झालेला गैरव्यवहार या गोंधळात या घरकुलांमध्ये सुविधा देण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे या घरकुलांची आजची स्थिती अत्यंत वाईट असून तेथे गटारी, रस्ते, स्वच्छता, पथदिवे नसल्याने तेथील नागरिक सुविधांअभावी बेजार झाले आहेत. 

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात 
महापालिकेच्या या घरकुलांमध्ये सुविधा दिल्या जात नसल्याने तेथे कच्च्या गटारी आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाण्याचे डबके साचल्याने डासांचा उपद्रव मोठा असल्याने साथरोगांचे प्रमाण या भागात वाढत आहे. त्यात सर्व परिसर मोकळा व काटेरी झुडपे, गवताने व्यापला आहे. त्यामुळे साप, विंचू यांचा धोका कायम आहे. 

सेवाकराची सुमारे 4 कोटी थकबाकी 
घरकुल देताना घरकुलमधील नागरिकांकडून पाच रुपये प्रति दिवस यानुसार सेवाकर आकारण्याचे ठरले होते. परंतु, सेवाकर आकारला गेला नसल्याने सुमारे या घरकुलधारकांचे सुमारे चार कोटी रुपये थकलेले असून, याबाबत महापालिकेच्या महासभेत हे पैसे वसूल करण्यासंदर्भात सदस्यांनी महासभेत मागणी केली होती. 

अशी आहे आकडेवारी 
- पिंप्राळा-हुडको : 4 हजार 500 घरकुलांची योजना 
- दुमजली इमारतीत : सुमारे 3000 
- कुटुंबांचा रहिवास : 2500 
- न बांधलेली घरकुले : 1500 
- घरकुलांसाठी वापरलेली जागा : 7 हेक्‍टर 

loading image
go to top