जिल्ह्यातून 49 जण दोन वर्षांसाठी हद्दपार 

जिल्ह्यातून 49 जण दोन वर्षांसाठी हद्दपार 

जिल्ह्यातून 49 जण दोन वर्षांसाठी हद्दपार 

जळगाव : सण, उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली असून, जिल्हाभरातून आतापर्यंत 49 जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, तर 71 जणांवर हद्दपारीची कारवाईची प्रकिया सुरू आहे. तसेच उपद्रवी गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या टोळ्यांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. गुन्ह्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्यांसह प्रत्यक्ष किंवा पदड्यामागच्या गुन्हेगारांवरही पोलिस दल लक्ष ठेवून आहे, असा इशारा डॉ. पंजाबराव उगले यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 
पोलिस अधीक्षक यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉ. उगले यांनी 2017, 2018 तसेच यंदाचे वर्ष 2019 या वर्षामध्ये जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींबाबत माहिती दिली. तसेच आगामी काळातील उत्सवांमध्ये सोशल मीडिया, तसेच इतर माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दलातर्फे विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यंदा प्रथमच बंदोबस्तासाठी शीघ्रकृती दल (रॅपिड ऍक्‍शन फोर्स) मागविण्यात आला. तसेच विसर्जन मार्गावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्सव आनंदाने साजरा करताना कायदा व सुव्यव्यस्थेचेही पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले. 

"डीजे' वाहनांवर कारवाई 
"डीजे'चालक बेकायदेशीरपणे विनापरवाना वाहनांत बदल (मॉडिफाइड) करत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सोमवारी आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने आरटीओ विभागाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांमध्ये डीजे सेट बसवून ध्वनिप्रदूषणाबाबत मानदंडाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातील पोलिस ठाणे, पोलिस दूरक्षेत्र यांनाही सूचना करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील वाहने आढळून आल्यास तत्काळ कळविण्याचे सांगण्यात आले असल्याचेही डॉ. उगले यांनी यावेळी सांगितले. 

सायबर पोलिस "अलर्ट'वर 
व्हॉट्‌सऍप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जातिधर्माच्या भावना दुखविले जाणारे संदेश पसरविले जातात. अशा प्रकारे संदेश पसरविणाऱ्यांवर पोलिस विभागाची करडी नजर राहणार असून, अशाप्रकारे जाती-धर्माच्या भावना दुखावणारे व्हिडिओ किंवा छायाचित्र पसरविणाऱ्या, प्रसारित करणाऱ्या, लाईक, शेअर किंवा त्यावर कॉमेंट करणाऱ्यांची गय केली जाणार नसून, त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील. सोशल मीडियावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यांसह पोलिसदलाचे सोशल मीडिया सेल 24 तास नजर ठेवून आहेत. धार्मिक भावना भडकवणारे संदेश, छायाचित्र चित्र व्हायरल झाल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांतर्फे करण्यात आले. 

जिल्ह्यात दोन हजारांवर गणेश मंडळे 
जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने विसर्जन करण्यात येते. यात 2 सार्वजनिक तसेच 8 खासगी अशा 10 मंडळांनी 3 दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे, 136 सार्वजनिक, 34 खासगी अशा 170 मंडळांनी 5 दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे, 6 मंडळांनी 6 दिवसांच्या, 293 मंडळासह एक गाव एक गणपती असलेल्या 11 गावांनी 7 दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे. 22 मंडळ तसेच एका गावाने 8 दिवसांच्या गणेशाची, 117 मंडळांनी तसेच 5 गावांतर्फे 9 दिवसाच्या, 33 मंडळांनी तसेच 13 गावांनी 10 दिवसांच्या तर 1529 मंडळांनी तसेच 105 गावांतर्फे 11 दिवसांची स्थापना करण्यात आली आहे. 

"मोहरम'मध्ये निघणार 854 सवारी 
आगामी काळात मोहरम सण साजरा होत असून, यात 854 सवारी, 36 ताबूत, 33 वाघ, पंजे 1, परी 3, डोले 9, इतर 58 असे प्रकार होणार असून, 159 सवारीचे जागेवर विसर्जन होईल. मिरवणूक संख्या 835 अशा असून मोहरम पाचव्या दिवशी स्थापन, अशा प्रकारे मुस्लिम समुदाय "मोहरम' सण साजरा करणार आहे. 


आणखी 71 जणांवर होणार कारवाई 
गेल्या तीन वर्षांत म्हणजे 2017 मध्ये 12, 2018 मध्ये 13 तर 2019 मध्ये 49 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे हद्दपार आरोपींची संख्या आता 74 वर पोहोचली आहे. यात जळगाव शहरातील 38 आरोपींचा समावेश आहे. तर यावर्षी हद्दपार करण्यात आलेल्यांमध्येही 12 जण जळगाव शहरातील आहेत. तसेच 71 जणांवरही हद्दपारीची कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी डॉ. उगले यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com