esakal | कन्नड घाट वाहतुकीस खुला; अवजड वाहनांना बंदी कायम
sakal

बोलून बातमी शोधा

कन्नड घाट वाहतुकीस खुला; अवजड वाहनांना बंदी कायम

कन्नड घाट वाहतुकीस खुला; अवजड वाहनांना बंदी कायम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चाळीसगाव: दरड कोसळल्याने सुमारे पंधरा दिवसांपासून बंद असलेला कन्नड घाटातील रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, केवळ दुचाकी व चारचाकी वाहनांनाच घाटातून जाण्यासाठी तूर्त परवागनी देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रकसारख्या अवजड वाहनांना अजूनही बंदीच आहे.

हेही वाचा: वालदेवीत विसर्जनाला येऊ नका; गणेशभक्तांना पोलिसांचे आवाहन

अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याने कन्नड (औट्रम) घाट पंधरा दिवसांपासून बंद असल्याने घाटातून होणारी वाहतूक कसाबखेडामार्गे शिऊर बंगला येथून तलवाडामार्गे वळवण्यात आली होती. या रस्त्यावर जड वाहनांचीही वाहतूक सुरू होती. शिवाय, खराब रस्त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक जाम होत असल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. ३१ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टी दरम्यान, घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली. त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतुकीसाठी बंद केला. महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

मात्र, पुन्हा पाऊस झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेता घाटातून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. सुमारे पंधरा दिवसांपासून घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. आता हा रस्ता केवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अजूनही घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांसाठी रस्ता पूर्णपणे सुरू करणे सुरक्षित नाही.

त्यामुळे औरंगाबाद किंवा धुळेकडे वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक औरंगाबाद- देवगाव रंगारी- शिऊर बंगला- नांदगाव किंवा मालेगाव किंवा धुळ्याकडून तर औरंगाबादकडून चाळीसगाव जाणारी वाहतूक औरंगाबाद- देवगाव रंगारी- शिऊर बंगला- नांदगावमार्गे सुरू आहे. दरम्यान, ही वाहतूक अजून किती दिवस अशीच सुरु राहील, याबाबत ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे केवळ दुचाकी व चारचाकी वाहनांनाच कन्नड घाटातून जाता येणार आहे.

loading image
go to top