बुराई प्रकल्पातील पाणीसाठा राखीव ठेवा; निजामपूर ग्रामपंचायतीचे पर्यटनमंत्र्यांना साकडे!

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बुराई प्रकल्पाविषयी मागणी करण्यात आली.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे गावांसाठी बुराई धरणातील पाणीसाठा जाणीवपूर्वक राखीव ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली. सरपंच सलीम पठाण यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

जैताणे (ता. साक्री) येथील शिवाजीरोडवर आयोजित एका कार्यक्रमादरम्यान हे निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच सलीम पठाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, भाजपचे निजामपूर शहराध्यक्ष महेंद्र वाणी, सामाजिक कार्यकर्ते जाकीर सय्यद, रघुवीर खारकर, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.

सद्या दोन्ही गावांना कडक उन्हाळ्यासह भीषण दुष्काळाबरोबर भीषण पाणीटंचाईचाही सामना करावा लागत असून परिसरात एकही पाणीस्रोत नसल्याने जमिनीची पाणीपातळी खालावली आहे. आगामी दोन ते अडीच महिने ग्रामस्थांना ही पाण्याची समस्या भेडसावणार असून बुराई मध्यम प्रकल्पातील पिण्याचा पाणीसाठा राखीव ठेवून वरिष्ठ पातळीवर त्वरित पाठपुरावा करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान भाजपा कार्यकर्ते किरण भदाणे, दशरथ शेलार आदींनीही निवेदनाद्वारे मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे त्यांच्या प्रभागातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून कुपनलिकेसह विजपंपासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

Web Title: Keep the water reservoir in the burai project demands nijampur grampanchayat