'राष्ट्रवादी'च ठरणार 'किंगमेकर': किरण शिंदे

'राष्ट्रवादी'च ठरणार 'किंगमेकर': किरण शिंदे
'राष्ट्रवादी'च ठरणार 'किंगमेकर': किरण शिंदे

राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न

निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी केले. साक्री येथील अंगणवाडी पतसंस्थेच्या सभागृहात मंगळवारी (ता. 21) सायंकाळी पाचला झालेल्या तालुका बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय व चर्चा करताना ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष किरण शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप बेडसे, किरण पाटील, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, ऍड. शरद भामरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उज्वला बेडसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे, माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी माजी कृषी सभापती सचिन बेडसे, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप बेडसे, किरण पाटील, प्रा. नरेंद्र तोरवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. यात विशेषतः संघटनात्मक पक्ष बांधणी, उमेदवार चाचपणी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे, नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडून घेणे, काँग्रेससोबत सन्मानपूर्वक आघाडी करणे, पक्षाची तालुक्यातील सद्यस्थिती तपासून पहाणे आदींबाबत चर्चा झाली.

सचिन बेडसे यांनी 'पक्षाची तालुक्यातील अवस्था टिकाऊही नाही व टाकाऊही नाही' असे मत मांडले. सरपंच संजय खैरनार यांनी ओबीसी व बहुजन समाज राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कमपणे उभे करण्याचे आश्वासन दिले. तर प्रा. संदीप बेडसे यांनी पक्षाची तालुक्यातील अवस्था अजूनही आशादायक असल्याचे प्रतिपादन केले. ज्योती पावरा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे यांनी काँग्रेसला जर आपली गरज नसेल तर आपल्यालाही त्यांची गरज नसल्याचे परखडपणे सांगितले. किरण पाटील यांनी साक्री तालुक्यात किमान सहा गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहतील असा अंदाज व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादीतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींची कार्यशैली ही हुकूमशाही पद्धतीची असून अटलजींच्या काळातील भाजपा व आजच्या काळातील भाजपमध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. केवळ पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे स्वप्न त्यांनी आता यापुढे पाहू नये असा टोलाही त्यांनी लगावला. फुले-शाहू-आबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पक्षप्रमुख शरद पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, ना. सुनील तटकरे, ना. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आदींच्या मार्गदर्शनाखाली जातीयवादी व मनुवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे, असेही पुढे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाने सन्मानपूर्वक आघाडी केल्यास निश्चितच त्यांचे स्वागत आहे. परंतु केवळ फरफटत जाण्याची भूमिका यापुढील काळात घेतली जाणार नाही असे संकेतही त्यांनी दिले. सद्या काँग्रेस पक्षही अडचणीत असून जशी आम्हाला त्यांची गरज आहे तशी त्यांनासुद्धा आमची गरज आहे, अशी स्पष्ट आणि परखड मतेही त्यांनी मांडलीत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेत पक्षाच्या जागा कशा वाढतील याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करा, असा कानमंत्र त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

27 ऑगस्टला आरक्षण सोडत...
27 ऑगस्टला धुळे जिल्हा परिषदेची व पंचायत समित्यांच्या गट-गणांची आरक्षण सोडत काढण्यात येणार असून त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल. निजामपूर गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव निघाल्यास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे यांना गटातून उमेदवारी करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, माजी उपसभापती प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे, माजी कृषी सभापती सचिन बेडसे आदींनी यावेळी केले.

बैठकीला माजी उपसभापती डॉ. रवींद्र ठाकरे, माजी कृषी सभापती सचिन बेडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेश बागुल, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नवल खैरनार, ग्रामपंचायत सदस्य शानाभाऊ बच्छाव, विलास देसले, सतीश बाविस्कर, दौलत जाधव, दिलीप बागुल आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. नरेंद्र तोरवणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com