'ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे.

नाशिक - ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करत समाजसेवेचा भाव जपावा, असे आवाहन श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे संस्थापक तथा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी यांनी केले.

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. 

मान्यवरांच्या हस्ते वैद्य सुभाष रानडे, वैद्य भालचंद्र भागवत यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. वाटवाणी यांनी आपल्या संस्थेचा प्रवास उलगडून सांगतांना आलेल्या चांगल्या-वाईट आठवणींची माहिती दिली. 

पोलिस बंदोबस्तात सामाजिक कार्य सुरू ठेवले; पण हिंमत हरलो नसल्याने अनेक मानसिक रुग्णांचे त्यांच्या घरी पुनर्वसन करण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.  या वेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. म्हैसेकर म्हणाले, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरच आरोग्य विद्यापीठे नोडल सेंटर म्हणून भूमिका बजावतील. डब्ल्यूएचओने यंदा जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी आरोग्य, सर्व ठिकाणी आरोग्य सुविधा’ या संकल्पनेत विद्यापीठ योगदान देईल. 

सुवर्णपदक, अन्य पुरस्कारांचे वितरण
रोहन पै, अमेय माचवे, अर्शिया चौधरी, सिद्धी सांगलीकर, शंतनू खन्ना, क्रिष्णा अग्रवाल, श्री सरन, यशोदा मलाडकर, हर्षिथा शेट्टी, कीर्ती गायकवाड, प्राजक्‍ता वायकर, वर्षा पठारे, सादिया पिंजारी, मसमा नझ मोमीन इकबाल, प्राप्ती कालडा, धनश्री पाटील, डेजुल देढिया, फर्नांडिस, निभा कुमारी, खुशाली शहा यांना सुवर्णपदके प्रदान केली. तर डॉ. स्वानंद शुक्‍ला (मोतीवाला होमिओपॅथिक महाविद्यालय) यांना उत्कृष्ट एनएसएस कार्यक्रम अधिकारी, उत्कृष्ट एनएएस युनिट मोतिवाला होमिओपॅथी महाविद्यालय, उत्कृष्ट स्वयंसेवक आकाश देशमुख (टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे), कुमारी इंदू आर्म फोर्स वैद्यकीय महाविद्यालय, पुणे). रक्षा जाजू, श्‍वेता शेरवेकर, मेधाली रेडकर यांना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान केली. तर उत्कृष्ट क्रीडा विद्यार्थी पुरस्काराने प्रवीणा काळे, रक्षा जाजू, रेश्‍मा भुसारे, शिवम बारहत्ते यांचा सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knowledge is used for social service says senior psychiatrist Dr. Bharat vatwani