Agriculture News : 10 कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित; कृषी विभागाकडून कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture input sector

Agriculture News : 10 कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित; कृषी विभागाकडून कारवाई

धुळे : विभागीय कृषी सहसंचालक (नाशिक) मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (धुळे) यांच्या आदेशानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि धुळे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत शहरासह जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला तर दोन खत विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द केले. (License of 10 agricultural input Centre was suspended by Department of Agriculture Dhule news)

नोंदणी प्रमाणपत्र ठळक व सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित न करणे, साठापुस्तक अद्ययावत न ठेवणे, साठा फलक व दरफलक नसणे, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बिलांवर विक्रेत्याची आणि शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे, रासायनिक खत विक्रीचा मासिक प्रगती अहवाल नोंदणी प्राधिकाऱ्यांना सादर न करणे, तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची पूर्तता न करणे, खुलासा सादर न करणे, सुनावणीप्रसंगी परवाना अधिकाऱ्यांनी मागितलेले अभिलेख सादर न करणे, ई-पॉस मशीनवरील खतसाठा व प्रत्यक्षात उपलब्ध खतसाठा न जुळणे आदी विविध कारणांनी दहा विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले.

दोन परवाने रद्द

बालाजी अ‍ॅण्ड सफायर क्रॉप सायन्स (धुळे) ने नोंदणी प्रमाणपत्रात दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या सर्व उत्पादकांच्या स्रोतांचा समावेश न करताच खतांची विक्री केली. अप्रमाणित ठरतील अशा खतांची शेतकऱ्यांना विक्री केल्याने तर रविना ट्रेडर्स (मालपूर ता. साक्री) येथे पॉस मशिनचा वापर न करताच अनुदानित खतांची विक्री केल्यामुळे विक्री केंद्रांचा खत विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.

दरम्यान, टॉप-२० युरिया खरेदीदारांना विक्री करणाऱ्या खत विक्री केंद्रांची तसेच अप्रमाणित खत विक्री करणाऱ्या व खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या खत विक्री केंद्रांची सुनावणी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे यांच्याकडे होईल.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

...तर कारवाई

खत विक्रेता खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करत असेल किंवा अप्रमाणित ठरतील अशा खतांची जाणीवपूर्वक विक्री करत असेल तर त्यांच्या परवान्यांवर कारवाई होईल असा इशारा विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिला.

खत विक्रेत्यांनी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात खतसाठ्याची तसेच किमतीची माहिती लावावी. खतांचे कुठे लिंकिंग होणार नाही व ज्यादा दराने विक्री होणार नाही, यासंबंधी खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांना खतांचे पक्के बिल द्यावे तसेच अनुदानित खतांची विक्री पॉस मशिनद्वारेच करावी. हलगर्जीपणा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही श्री. वाघ यांनी दिला.

या केंद्रांचे निलंबन

शिवदर्शन ट्रेडर्स (नंदाणे, ता. धुळे), एकवीरा कृषी सेवा केंद्र (सांगवी, ता. शिरपूर), ज्ञानेश्वरी कृषी सेवा केंद्र (दराणे, ता. शिंदखेडा), धरतीधन कृषी सेवा केंद्र (दाऊळ, ता. शिंदखेडा), रेणुका कृषी सेवा केंद्र (सुळे, ता. शिरपूर), श्रीपाद कृषी सेवा केंद्र (शिरपूर), गोपाळ ट्रेडर्स (धुळे), राम ॲग्रो (साक्री), यश ॲग्रो एजन्सी, कपिलेश्वर फर्टिलायझर (बेटावद, ता. शिंदखेडा) या दहा कृषी खत केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला.