
Dhule : अजगराच्या 13 पिलांना जीवदान
शिरपूर (जि. धुळे) : जागरुक शेतकरी आणि प्राणिमित्रांच्या सहकार्याने अजगराच्या (Python) १३ पिलांना जीवदान मिळाले. शेतात आढळलेली अंडी नैसर्गिक वातावरणात उबवून त्यातून सुरक्षितरित्या पिलांना बाहेर काढण्यात प्राणिमित्रांना यश प्राप्त झाले. पिलांना लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. (Life of 13 baby python saved dhule Latest Marathi News)
अंतुर्ली (ता.शिरपूर) येथील गोकूळ पौलाद ईशी यांच्या शेतात २६ जूनला मशागत सुरु होती. शेताच्या खबदाडीच्या भागात त्यांना काही अंडी आढळली. ती काहीशी वेगळी असल्याचे जाणवल्याने ईशी यांनी वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम व येथील नेचर काँझर्व्हेशन फोरमचे अध्यक्ष तथा प्राणिमित्र योगेश वारुळे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली.
वारुळे यांना अंड्यांचे फोटोही पाठवले. ती पाहून वारुळे यांनी अंडी अजगराची असल्याचे सांगितले. त्यावर ईशी व त्यांचे कुटुंब भयभीत झाले. मात्र वारुळे यांनी त्यांचे समुपदेशन करुन भीती दूर केली.
हेही वाचा: तिघे सराईत चैनस्नॅचर जेरबंद; 7 तोळे सोने जप्त
वनपाल संदीप मंडलिक, सर्पमित्र महेश करंकाळ यांनी अंतुर्ली येथे जाऊन पाहणी केली. अंड्यांची पूर्ण वाढ झालेली नव्हती. त्यांना ऊब देऊन किमान २० दिवस निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून आले.
मात्र शेतीमध्ये ऊब मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्पमित्रांनी सर्व १४ अंडी ताब्यात घेऊन शिरपूरला आणली. सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव, वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम यांच्या सूचनेनुसार, प्राणीमित्र योगेश वारुळे यांच्या देखरेखीखाली नैसर्गिक वातावरणात अंडी उबवण्यात आली.
१४ पैकी १३ अंडी फलित होऊन २३ जुलैला १३ पिलांचा जन्म झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश बारी यांनी प्राथमिक तपासणी करुन पिले निरोगी असल्याचा निर्वाळा दिला. जागरूक शेतकरी गोकूळ ईशी यांच्या समयसूचकतेचे वनविभागाने कौतुक केले. वारुळे यांच्यासह महेश करंकाळ, महेंद्र कोळी पिलांची निगा राखत आहेत.
"अजगर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची एकमधील प्राणी असून त्याचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. अजगरासह कोणतेही साप आढळल्यास त्यांना मारण्यासारखे पाऊल न उचलता संस्थेशी संपर्क साधावा. आमचे स्वयंसेवक तातडीने आपल्या मदतीसाठी येतील. वादळ, पावसामुळे पक्ष्यांची घरटी पडलेली आढळल्यास माहिती द्यावी."
-योगेश वारुळे, अध्यक्ष, नेचर काँझर्व्हेशन फोरम
हेही वाचा: पुतण्यानेच मारला पावणे दोन लाखांवर डल्ला; घरफोडीची 24 तासात उकल
Web Title: Life Of 13 Baby Python Saved Dhule Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..