सरकारी शिपायाचा प्रताप; तब्बल 60 टक्के व्याजाने दिले कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money

सरकारी शिपायाचा प्रताप; तब्बल 60 टक्के व्याजाने दिले कर्ज

धुळे : एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्यानंतर आता इतर अवैध सावकारांचेही प्रताप समोर येत आहेत. समाज कल्याण विभागाचा शिपाई व्याजाने पैसे देत असून, त्याने महिलेच्या अडचणीचा गैरफायदा घेतला. दोन लाख रुपये देत एक लाख रुपये तब्बल ६० टक्के व्याजाने दिले. तसेच घराची सौदा पावतीही करून घेतली. नंतर एक लाखाच्या बदल्यात दहा लाखांची मागणी करीत तोपर्यंत घर रिकामे करणार नाही, अशी धमकी देत त्रास दिला. या प्रकरणी शिपायावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार कॉलनीत माधुरी प्रशांत मराठे (वय ४५) यांचे वास्तव्य आहे. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समाज कल्याण विभागाचा शिपाई रवींद्र अर्जुन शिरसाट (रा. भावसार कॉलनी) हा अवैध सावकारीचा व्यवसाय करतो. त्याने कॉलनीतील अनेकांना व्याजाने पैसे दिले आहेत. फिर्यादी महिलेला मालकीच्या प्लॉट नंबर ३३ मधील पूर्वीचे ताबेगहाण पद्धतीने राहणाऱ्या भाडेकरुंना तत्काळ दोन लाख रुपये परत करायचे होते. त्याचा फायदा घेत दोन लाख रुपये दिले.

तसेच एक लाख रुपये ६० टक्के व्याजाने देत ताबेगहाण करारनामा करुन घेतले. जास्त व्याजासाठी आणि त्यापोटी त्याने न घेतलेल्या चार लाख रुपयांची ताबे गहाण पावती करुन स्वत:जवळ ठेवली. नंतर फिर्यादीच्या सासू राधाबाई रघुनाथ भालशिंगे यांची फसवणूक करत घराची सौदा पावती करुन घेतली. घर विक्रीसाठी तगादा लावून वकिलामार्फत नोटीस पाठवत फिर्यादीला धमकी दिली. तसेच सध्या शिरसाट हा फिर्यादीच्या तळमजल्यावरील घरात राहत असून मोठ्या प्रमाणावर व्याजाने पैशांची मागणी करत आहे. हा प्रकार पाच जून २०१५ पासून ते आजपर्यंत सुरू होता. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तपास करीत आहे.

टॅग्स :Dhuleloansblack money