लॉकडाउन'मध्ये साकेगावचा नवा पूल उभारण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 एप्रिल 2020

पूल केव्हाही पडण्याआधी चौपदरीकरणातील नव्या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनानेही या पुलाच्या कामाला "लॉकडाउन'मध्ये अत्यल्प कामगारांद्वारे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 

जळगाव : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या तरसोद ते चिखली दरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम "कोरोना'च्या संकटामुळे रखडले आहे. मात्र, साकेगाव (ता. भुसावळ) येथील वाघूर नदीवरील पुलाला धोका निर्माण झाला आहे. हा पूल केव्हाही पडण्याआधी चौपदरीकरणातील नव्या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनानेही या पुलाच्या कामाला "लॉकडाउन'मध्ये अत्यल्प कामगारांद्वारे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 

नक्‍की पहा -  कोरोनाग्रस्त महिलेचा मुंबई- औरंगाबाद प्रवास; संपर्कातील १४ जण जळगावला रवाना

तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 20 मार्चपर्यंत वेगात सुरू होते. मात्र, 24 मार्चपासून देशभरात "लॉकडाउन' सुरू झाल्याने हे काम बंद पडले. त्यामुळे जूनपूर्वी चौपदरीकरणाच्या मार्गात येणारे मोठे पूल पूर्ण होणार होते. पंरतु "कोरोना'मुळे चौपदरीकरणाचे कामही बंद झाले. दरम्यान, जळगाव ते भुसावळ दरम्यान येणाऱ्या वाघूर नदीवरील पूल कमकुवत होऊन त्यावर खड्डेही पडले होते. त्यामुळे धोका निर्माण झाला होता. त्यात काम बंद पडले, "लॉकडाउन'मुळे पुलावरील वाहतूकही कमी झाली. असे असताना मालवाहतूक, अत्यावश्‍यक सेवांच्या वाहनांना परवानगी दिल्याने वाघूरवरील पुलावरील वाहतूक वाढली. वाढलेली वाहतूक व "लॉकडाउन'चा 3 मेपर्यंत वाढलेला कालावधी लक्षात घेता येथील महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीत पत्रव्यवहार करून विशेष बाब म्हणून वाघूर नदीवरील नव्या पुलाच्या उभारणीस तातडीने परवानगी द्यावी; अन्यथा पूल कोसळेल व वाहतुकीस धोका निर्माण होईल, असे सांगितले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला वाघूर नदीवरील पुलाचे काम करण्यास परवानगी देण्यास सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याने वाघूर नदीवर नव्या पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या कामास सुरवात झाली आहे. 

नव्या पुलाचे काम वेगात 
वाघूर नदीवरील नव्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी "जेसीबी'द्वारे भराव टाकण्याचे काम, पुलावर सुरक्षा कठडे तयार करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. सोबतच नव्या पुलाला जोडण्यासाठी चौपदरीकरणाच्या रस्त्याचेही काम सुरू झाले आहे. कामाची गती पाहता 15 मेपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

ठिकठिकाणी कामे सुरू 
महामार्ग चौपदरीकरणात येणाऱ्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकणे, रस्त्यांच्या दोन्ही कडेला असलेल्या गटारांवर ढापे टाकणे, जोडरस्त्यांना जोडणारे खड्डे भरणे आदी कामे करताना वेल्स्पन कंपनीचे कर्मचारी काम करताना दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown sakegaon bridge complit collector order