कोरोनाग्रस्त महिलेचा मुंबई- औरंगाबाद प्रवास; संपर्कातील १४ जण जळगावला रवाना

योगेश महाजन
Sunday, 19 April 2020

मुंगसेसह परिसरातील सात किलोमीटर अंतरावरील गावे सील करण्यात आली आहेत. या महिलेच्या संपर्कातील सुमारे १४ जणांना जळगाव येथे हलविण्यात आले

अमळनेर : मुंगसे (ता. अमळनेर) येथील एका साठ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाल्याने अमळनेर तालुका हादरला आहे. कोरोनाग्रस्त महिलेने मुंबई- औरंगाबाद प्रवास केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात येत असून, आतापर्यंत १४ जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

नक्‍की पहा - नंदुरबार येथील तो कोरोनाग्रस्त भुसावळला आल्याची माहिती 

होम टू होम तपासणी
वैद्यकीय पथक आज सकाळीच मुंगसे येथे दाखल झाले आहे. मुंगसेसह परिसरातील सात किलोमीटर अंतरावरील गावे सील करण्यात आली आहेत. या महिलेच्या संपर्कातील सुमारे १४ जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. १२ जण मुंगसेचे असून, सावखेडा येथील एक डॉक्टर व त्यांच्या पत्नी असे दोन जण आहेत. वैद्यकीय पथकाकडून होम टू होम ग्रामस्थांची तपासणी सुरू झाली आहे. डॉ. प्रकाश ताळे, डॉ. आशिष पाटील, डॉ. प्रशांत कुळकर्णी, डॉ. संजय पाटील, गटविकास संदीप वायाळ, हवालदार प्रभाकर पाटील यांचे पथक तपासणी करीत आहे.

प्रशासनाचा हाय अलर्ट
मुंगसे येथील महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन मुंगसे व परिसरातील गावांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. आज सकाळी पोलिस ताफ्यासह वैद्यकीय, महसूल पथक दाखल झाले आहे. मुंगसे, रूंधाटी, सावखेडा, दापोरी या गावांमध्ये टीसीएलची फवारणी करण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्त महिलेचा मुंबई- औरंगाबाद प्रवास
मुंगसे येथील कोरोनाग्रस्त महिला मुंबई येथे मुलांकडे गेली होती. तीन महिन्यापूर्वी ती मुंगसे येथे मूळ गावी परतली होती. त्यानंतर ती महिला औरंगाबाद येथेही जाऊन आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महिलेचा मुंबई- मुंगसे- औरंगाबाद व पुन्हा मुंगसे हा प्रवास झोप उडविणारा आहे. त्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिने सावखेडा येथील एका डॉक्टरकडे उपचार केले होते. त्यानंतर चोपडा येथील एका खासगी रुग्णालयात ती महिला उपचार घेत होती. प्रकृती अधिक खालावल्याने शुक्रवारी ती महिला जळगाव येथे दाखल झाली होती. तीचा अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाला असून, कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमळनेर तालुक्यात संचारबंदी
काल रात्री मुंगसेच्या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने तालुका पूर्णपणे हादरला आहे. विशेष करून ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. काल मध्यरात्रीपासून ग्रामीण भागातही गल्ल्या लॉक करण्यात आल्या आहेत. शहरातही तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉस्पिटल वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. पोलिसांची गस्त सुरू असून, जो बाहेर दिसेल त्यावर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner corona positive women mumbai auragabad travling