Maharashtra Bank : महाराष्ट्र बँकेचे कार्यालय ‘सील’; मनपा आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation team sealing Maharashtra Bank office on Wednesday over property tax arrears

Maharashtra Bank : महाराष्ट्र बँकेचे कार्यालय ‘सील’; मनपा आक्रमक

धुळे : थकीत (Arrears) मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने (dhule municipal corporation) आक्रमक पवित्रा घेतला असून, याअंतर्गत खोल गल्लीतील थेट बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यालयच बुधवारी (ता. ८) पथकाने सील केले.

बँकेने एक कोटी १४ लाखांचा मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई झाली. (maharashtra bank Sealed by municipal corporation due to arrears dhule news)

शहरातील खोल गल्लीत पाटबाजारालगत बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यालय आहे. ते राजवाडे संशोधन मंडळाने भाड्याने दिले आहे. भाडेपट्टीत नमूद केल्याप्रमाणे २०११ पासून मार्च २०२३ पर्यंत बँक ऑफ महाराष्ट्रकडे तब्बल एक कोटी १४ लाख ३६ हजार ६९२ रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

या प्रकरणी बँकेला दर वर्षी महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येत होती. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून यंदा मार्चमध्ये बँकेला तडजोडीसाठी नोटीस बजावण्यात आली. कामकाजावेळी बँकेने तडजोडीस नकार दिला.

त्यामुळे महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पुन्हा बँकेला नोटीस बजावली. त्यास बँकेने प्रतिसादच दिला नाही. सरतेशेवटी महापालिकेने बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यालय सील केले आहे. या प्रकरणी बँकेने तोडगा काढला नाही तर ग्राहकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

चार दुकानेही सील

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मधुर कॉम्प्लेक्समधील चार दुकानेही बुधवारी मनपाच्या पथकाने सील केली. ही चारही दुकाने तळमजल्यावरील आहेत. यात सविता रमेश चंदलानी यांच्याकडे एक लाख आठ हजार ४४५, भगवानदास वधवा यांच्याकडे ६८ हजार ७३८,

अशोक मेघानी यांच्याकडे ६० हजार १४७, तर राजेंद्र होलाराम यांच्याकडे ५७ हजार ९२० रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकीचा भरणा न केल्याने या चारही जणांची दुकाने सील करण्यात आली. महापालिकेचे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर वडनेरे, मुकेश अग्रवाल, सुनील गढरी, संजय शिंदे, अनिल सुडके, राजू गवळी, प्रदीप पाटील, अनिल जोशी, मधुकर पवार, अशोक मंगीडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.